पीएमसी बँकेने परस्पर गुंतवली डेअरीची ठेव : संशयास्पद व्यवहारामुळे ऑडिटही रखडले
प्रतिनिधी /पणजी
गोवा डेअरीने पीएमसी बँकेत ठेवलेले 7 कोटी रुपये हे बँकेच्या विलिनीकरणानंतर युनिटी बँकेने पुढील 30 वर्षांकरीता शेअर्समध्ये त्यांची गुंतवणूक केल्याने गोवा डेअरीला जबरदस्त फ्ढटका बसला आहे.
प्राप्त माहितीनुसार शुक्रवार दि. 13 ऑक्टोबर 2017 रोजी तत्कालीन अध्यक्ष माधव सहकारी यांच्या अध्य़क्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठरावाद्वारे राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाने विविध योजनेद्वारे गोवा डेअरीत ठेवलेले 7 कोटी रुपयांहून अधिक रक्कम ही गोवा डेअरीने गोवा राज्य सहकारी बँकेत काही वर्षांकरीता ठेव ठेवली होती. मात्र या बॅंकेकडून केवळ 4 टक्के एवढेच व्याज मिळत असल्याने विषय क्र. 3 अंतर्गत त्या दिवशीच्या संचालक मंडळाच्या बैठकीतील इतिवृत्तानुसार संमत केलेल्या ठरावातील ही सर्व रक्कम राज्य सहकारी बँकेतून काढून जादा व्याज मिळविण्यासाठी पीएमसी बँकेत ठेवण्याच्या निर्णय घेऊन या संदर्भातील सारे व्यवहार करण्याचे व्यवस्थपकीय संचालक डॉ. नवसो सावंत, राधिका काळे व गौरेश बायकर यांना अधिकार देण्यात आले. सर्व कागदपत्रांवर सह्या करण्याचे अधिकार डॉ. नवसो सावंत यांना देण्यात आले होते.
डेअरीला न विचारता थेट निर्णय
सदर 7 कोटी व त्यापेक्षा अधिक रक्कम ही पीएमसी बँकेत ठेव म्हणून ठेवण्यात आली. कालांतराने जेंव्हा ही बँक अडचणीत आली त्यावेळी युनिटी बँकेने ती ताब्यात घेतली. युनिटी बँकेने गोवा डेअरीची सारी रक्कम शेअर्समध्ये पुढील 30 वर्षाकरीता घातली आहे. कारण गोवा डेअरीने जी माहिती दिली पाहिजे होती ती दिली नाही. त्यामुळे बँकेने न विचारताच थेट वरील निर्णय घेतला. आता ही रक्कम कुठे व कशी आहे याबाबत कोणीच माहिती देऊ शकत नाही व ही रक्कम परत काढता येत नाही. कदाचित आता ही रक्कम 8.50 कोटी झालेली असेल.
परिणामी डेअरीचे ऑडिट रखडले
या प्रकारामुळे गोवा डेअरीचा एकंदर हिशोब करण्यातदेखील मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. गेल्या तीन वर्षात गोवा डेअरीचे ऑडिट झालेले नाही. गोवा डेअरीमध्ये जे काही घोटाळे झाले आहेत त्यातील हा देखील एक घोटाळाचा आहे.
घोटाळेग्रस्त गोवा डेअरीच्या संकटात वाढ
गोवा डेअरीचे ऑडिट गेल्या तीन वर्षात झालेले नसल्याने आता केंद्राकडून आर्थिक मदत येणे बंद झालेली आहे. गोवा सरकार देखील अधिकृतरित्या आता मदत करू शकत नाही. त्यातून डेअरीच्या अडचणीत वाढ झाली असून तेथील कर्मचाऱयांना वेतन देणेही गोवा डेअरीला भविष्यात कठीण होऊन बसेल. अशा स्थितीत गोवा सहकार खाते या संस्थेच्या नूतन संचालक मंडळासाठी निवडणूक घेऊ पाहत आहे.