वृत्तसंस्था / मुंबई
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत बुधवारी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिमवर यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील तिसरा सामना खेळविला जात आहे. या मालिकेतील भारताने दुसऱ्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करून बरोबरी साधल्याने आता भारतीय संघ आपली विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी सज्ज झाला आहे.
नव्या मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमची प्रेक्षकांची क्षमता 47 हजार आहे. दरम्यान रविवारच्या सामन्यावेळी हे स्टेडियम शौकिनांनी भरगच्च केले होते. यापूर्वी दोन संघामध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ नेहमीच भारतावर मात करत असल्याचे दिसून आले पण गेल्या रविवारच्या सामन्यात हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सुपरओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. भारतीय खेळाडू बुधवारच्या सामन्यात पुन्हा दर्जेदार खेळ करून ऑस्ट्रेलियावर मात करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. भारतीय महिला संघाला आता ऋषीकेश कानिटकर हे प्रमुख प्रशिक्षक लाभले आहेत.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. भारताने दुसरा सामना जिंकून बरोबरी साधल्याने या मालिकेला अधिकच रंगत निर्माण झाली आहे. बुधवारच्या सामन्यात क्रिकेटच्या तिन्ही विभागात भारतीय संघाला विजयासाठी दर्जेदार कामगिरी करावीच लागेल. भारताची फलंदाजी पहिल्या दोन सामन्यात समाधानकारक झाली असली तरी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणमधील असलेल्या त्रुटी भारताला दूर कराव्या लागतील. भारतीय संघातील फिरकी गोलंदाज देविका वैद्य तब्बल आठ वर्षानंतर पहिली टी-20 मालिका खेळत आहे. स्मृती मंदाना, हरमनप्रित कौर, रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, राधा यादव यांच्यावर भारतीय संघाच्या फलंदाजीची भिस्त राहिल. तर रेणुका सिंग ठाकुर, देविका वैद्य, राजेश्वरी गायकवाड, अंजली सर्वांनी, मेघना हे भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आहेत. ऑस्ट्रेलियाची कर्णधार अॅलिसा हिली तसेच मॅकग्रा यांची फलंदाजी चांगलीच बहरत असल्याचे दिसून येते. ब्राऊन, पॅरे, गार्डनर हे ऑस्ट्रेलियन संघातील मधल्या फळीतील फलंदाज आहेत. बुधवारच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाज आक्रमक फटकेबाजीवर अधिक भर देत मोठी धावसंख्या रचण्यासाठी प्रयत्नशील राहतील. या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा आहे.
भारतीय संघ : हरमनप्रित कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटीया, रॉड्रीग्ज, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकुर, मेघना सिंग, अंजली सर्वानी, देविका वैद्य, एस. मेघना, रिचा घोष आणि देओल.
ऑस्ट्रेलिया संघ : अॅलिसा हिली (कर्णधार), मॅकग्रा (उपकर्णधार), ब्राऊन, पॅरे, गार्डनर, गॅरेथ, ग्रॅहॅम, हॅरीस, जोनासेन, किंग, लिचफिल्ड, बेथ मुनी, पेरी, स्कूट आणि सुदरलँड.
सामन्याची वेळ : सायं. 7 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क