केएल राहुलच्या नेतृत्वाची कसोटी, वनडे मालिका जिंकल्याने यजमानांचे मनोबल उंचावलेले मात्र भारताचेच पारडे जड
वृत्तसंस्था / चत्तोग्राम
भारत व यजमान बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी आज बुधवारपासून येथे सुरू होत असून कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्व कौशल्याची आणि त्याच्या फलंदाजीच्या क्षमतेची कसोटीच या मालिकेत लागणार आहे. काही प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीने भारतीय संघ अल्पसा कमकुवत झाला असून या मालिकेच्या निकालावर भारताची विश्व कसोटी चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) फायनलसाठी पात्रता अवलंबून असेल. भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सामन्याला सुऊवात होईल. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरून होईल.
डब्ल्यूटीसी गुणतक्त्यात भारतीय संघ सध्या चौथ्या स्थानावर असून ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व लंका पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. येत्या जूनमध्ये होणाऱ्या फायनलसाठी पात्र ठरण्याकरिता भारताला दोन्ही कसोटी आणि त्यानंतर मायदेशात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या चारही कसोटी जिंकाव्या लागणार आहेत. असे झाल्यास जर-तरचा प्रश्नच निर्माण होणार नाही. या प्रवासाची सुऊवात येथील झहूर अहमद स्टेडियमवर होत असून येथील खेळपट्टी नेहमीप्रमाणे फलंदाजीस अनुकूल असली तरी अखेरच्या टप्प्यात ती फिरकीस मदत करणारी बनते.
या कसोटीत भारतीय संघच फेव्हरिट असून बांगलादेशने कसोटीत आजवर भारताला एकदाही हरविता आलेले नाही. मात्र रोहित शर्मा, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा यांची उणीव भारताला जाणवण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या खेळपट्टीवर प्रतिस्पर्धी संघ तिसऱ्या किंवा चौथ्या डावात खेळतो तेव्हा जडेजाच्या गैरहजेरीमुळे भारत नेहमीच बॅकफूटवर जातो. बांगलादेशसारख्या उपखंडातील संघाविऊद्ध जडेजा-अश्विन जोडी नेहमीच घातक ठरते. पण अक्षर पटेलनेही दुसरे प्राधान्य असलेला डावखुरा स्पिनर म्हणून गेल्या दोन मोसमात आपली क्षमता दाखवून दिली आहे.
संघातील दहा खेळाडू फिट असल्यास अंतिम 11 मध्ये निवडीसाठी ते उपलब्ध असून दोन राहुल (कर्णधार केएल व प्रशिक्षक द्रविड) यांना महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे तो पाचव्या स्पेशालिस्ट गोलंदाजाचा. तिसरा पेसर की स्पिनर हा पेच त्यांच्यासमोर असेल. तिसरा स्पेशालिस्ट स्पिनर कुलदीप यादव व स्लो डावखुरा ऑर्थोडॉक्स सौरभ कुमार यापैकी कोणाची निवड करतात ते पहावे लागेल. नुकत्याच झालेल्या बांगलादेश अ विऊद्धच्या दोन कसोटींच्या मालिकेत सौरभने आपल्या प्रभावी फिरकीवर 15 बळी मिळविले आहेत. त्यामुळे कसोटी पदार्पणासाठी त्याने आपली बाजू समर्थपणे मांडली आहे. निदान एका सामन्यात तरी त्याला संधी मिळण्याची आशा आहे.
कर्णधार म्हणून राहुलची कसोटी
गेल्या वर्षभरात कर्णधार या नात्याने केएल राहुलकडून विशेष प्रभावी प्रदर्शन झालेले नाही. त्यामुळे दोन कसोटींच्या या मालिकेत त्याच्या नेतृत्वाची अॅसिड टेस्टच होणार आहे. सोमवारी मालिका ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी राहुल मीडियाशी बोलताना म्हणाला की, ‘सलग दुसऱ्यांदा डब्यूटीसीची अंतिम फेरी गाठण्यासाठी काय करण्याची गरज आहे, याची आम्हाला पूर्ण जाणीव असल्याने आक्रमक क्रिकेट खेळण्याचीच आमची योजना आहे.’ मात्र व्हाईटबॉल क्रिकेटमध्ये फलंदाजीत अपेक्षित चमक दाखवू न शकलेल्या राहुलला फलंदाजीत ही आक्रमकता दाखवावी लागेल. त्याच्या सोबतील युवा शुबमन गिलसह पुजारा, कोहली, श्रेयस अय्यर यांची साथ मिळेल. रिषभ पंत संघात परतला असून हा त्याचा आवडता फॉरमॅट असल्याने त्याची आक्रमक फलंदाजी पुन्हा एकदा शौकिनांना पहावयास मिळण्याची अपेक्षा आहे.
गोलंदाजी विभागात पाटा खेळपट्ट्यांवर प्रभावी मारा करणाऱ्या उमेश यादवला सिराज, अश्विन, अक्षर पटेल यांची कंपनी असेल. जादा स्पिनरऐवजी तिसरा पेसर निवडला गेल्यास जयदेव उनादकट व नवदीप सैनी यापैकी एकाला संधी मिळेल.
बांगलादेशचा विचार करता गेल्या 22 वर्षांतील विजयाचा दुष्काळ संपवायचा असल्यास त्यांना आपल्या खेळात मोठे बदल करावे लागतील. कसोटीमध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांना त्रास देऊ शकतील अशी गोलंदाजी त्यांच्याकडे नाही. अगदी घरच्या मैदानावरही ते फारसे प्रभावी ठरलेले नाहीत. पेसर्स तस्किन अहमद, इबादत हुसेन, शोरिफुल इस्लाम यांच्यासह शकीब अल हसन व तैजुल इस्लाम रेकॉर्ड बदलण्याचा प्रयत्न करतील. घरच्या मैदानावर तरी त्यांची फलंदाजी लाईनअप चांगले प्रदर्शन करताना दिसली आहे. त्यात अनुभवी शकीब हसन, मुश्फिकुर रहीम, माजी कर्णधार मोमिनुल हक यांचा समावेश आहे.
संभाव्य संघ…
भारत : केएल राहुल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुबमन गिल, कोहली, अय्यर, पंत, अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, नवदीप सैनी, उनादकट, सिराज, सौरभ कुमार, कोना भरत, कुलदीप यादव, अभिमन्यू ईश्वरन.
बांगलादेश : शकीब अल हसन (कर्णधार), लिटॉन दास, रहीम, मोमिनुल हक, मेहदी हसन मिराज, मेहमुदुल हसन जॉय, अनामुल हक बिजॉय, खालीद अहमद, इबादत हुसेन, शोरिफुल इस्लाम, तस्किन अहमद, तैजुल इस्लाम, नजमुल हुसेन शांतो, रेजॉल रहमान राजा, झाकिर हसन, नुऊल हसन, यासिर अली.
सामन्याची वेळ : सकाळी 9 पासून
- थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स नेटवर्क
- लाईव्ह स्ट्रीमिंग : सोनी लिव्ह