नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच भारत अमेरिकेकडून मोठय़ा प्रमाणात युरिया खरेदी करणार आहे. दक्षिण कोरियाची बहुउद्देशीय कंपनी सॅमसंगच्या माध्यमातून 47 हजार टन युरिया भारतात येण्यासाठी सज्ज आहे. हा युरिया अमेरिकेच्या न्यू ऑर्लिन्स बंदरातून भारताच्या मंगळूर बंदरात आणण्यात येत आहे.
आतापर्यंत भारताने अमेरिकेकडून गेल्या तीन वर्षांमध्ये केवळ 46 टन युरिया नमुन्यादाखल म्हणून आयात केला आहे. यावर्षी मात्र, ही आयात अनेक हजार पटींनी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या युरियाची किंमत वाहतूक, हमाली व इतर खर्च धरुन 716.5 डॉलर्स प्रतिटन इतकी असेल अशी माहिती आहे.
भारताने 2021-22 या आर्थिक वर्षात आतापर्यंत 10.16 दशलक्ष टन युरिया आयात केला आहे. यापैकी 2.79 दशलक्ष टन चीनकडून तर 1.62 दशलक्ष टन ओमानकडून आयात केला आहे. भारत संयुक्त अरब अमिरात, इजिप्त आणि युपेनकडूनही युरिया आयात करतो. यंदा प्रथमच अमेरिकेकडून इतक्या मोठय़ा प्रमाणात आयात होत आहे. भविष्यकाळात ती वाढेल अशी शक्यता आहे.