पंतप्रधान ट्रुडो यांच्या पक्षाची धुरा मेहरांकडे
वृत्तसंस्था/ टोरंटो
कॅनडात भारतीय वंशाचे सचित मेहरा हे देशाच्या लिबरल पार्टीचे नवे अध्यक्ष झाले आहेत. कॅनडात लिबरल पार्टी सत्तेवर असून जस्टिन ट्रुडो हे पंतप्रधानपदी आहेत. कॅनडाच्या ओटावामध्ये झालेल्या तीन दिवसीय संमेलनादरम्यान सचित मेहरा यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
लिबरल पार्टीच्या अध्यक्षाला पक्ष सदस्यांचे व्यवस्थापन करावे लागते. तसेच पक्षासाठी देणगी जमवून देशभरात पक्षाशी संबंधित कार्यक्रमांसाठी पक्षाध्यक्ष जबाबदार असतो. हा पक्ष एक टीम म्हणून अत्यंत प्रभावी आहे. या पक्षाची सेवा करण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला सन्मानित समजतोय. पक्षाला अधिकाधिक यश मिळवून देण्यासाठी आम्हाला जनतेपर्यंत पोहोचावे लागणार असल्याचे सचित मेहरा यांनी ट्विट करत म्हटले आहे.
कॅनडाच्या मॅनिटोबा प्रांतातील विन्निपेग शहराचे सचित मेहरा रहिवासी आहेत. त्यांचे आईवडिल 1960 मध्ये शिक्षणासाठी दिल्लीतून कॅनडात पोहोचले होते. मेहरा हे उद्योजक आहेत. त्यांचे कुटुंबीय कॅनडात ईस्ट इंडिया रेस्टॉरंट कंपनी चालविते. ही रेस्टॉरंट्स कॅनडाच्या विन्निपेग आणि ओटावा शहरात आहे.
सचित मेहरा यांनी मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये पक्षाच्या अध्यक्षपदासाठी स्वत:च्या नावाची घोषणा केली होती. फेडरल लिबरल एजेन्सीचे अध्यक्ष अन् यंग लिबरल्सचे अध्यक्ष म्हणून मेहरा यांनी स्वत:चे अनुभव मांडले आहेत. मेहरा यांनी 2021 मध्ये कोरोना महामारीदरम्यान भारताला ऑक्सिजनेटर पुरविण्यासाठी प्रयत्न केले होते.