वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा 33 वा मानांकित मनराज सिंग व महिला बॅडमिंटनपटू रक्षिता श्री एस. हे डच ज्युनियर इंटरनॅशनल व जर्मन ज्युनियर ग्रां प्रि बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताच्या 19 सदस्यीय पथकाचे नेतृत्व करतील. बीएआयने चार दिवसांची चाचणी घेतल्यानंतर या स्पर्धांसाठी भारतीय संघ निवडला आहे.
या वर्षातील या पहिल्या दोन ज्युनियर स्तरावरील प्रमुख स्पर्धा आहेत. 24 ते 27 जानेवारी या कालावधीत ग्रेटर नोएडा येथे निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. पुरुष विभागात मनराज सिंगने अव्वल यश मिळविले. त्यानंतर आयुष शेट्टी, लोकेश रेड्डी के, व गगन यांनी स्थान मिळविले. महिलांमध्ये रक्षिता श्री एस.ने पहिले स्थान मिळविले. त्यानंतर श्रेया लेले, जिया रावत, आलिशा नाईक यांनी स्थान मिळविले. ‘नवोदितांचा हा उत्तम संघ असून कनिष्ठ स्तरावर त्यांनी चांगले प्रदर्शन केले आहे. याशिवाय चाचणीमध्येही त्यांनी आपले कौशल्य दाखवून दिले आहे. या सर्वांमध्येच पदक जिंकण्याची क्षमता असल्याने ते या स्पर्धांत सर्वोत्तम कामगिरी करतील, अशी मला आशा वाटते,’ असे बीएआयचे सचिव संजय मिश्रा म्हणाले. डच ज्युनियर स्पर्धा 1 मार्चपासून हार्लेम येथे तर जर्मन ज्युनियर स्पर्धा 8 मार्चपासून बर्लिन येथे सुरू होणार आहे.
या स्पर्धांसाठी निवडलेले भारतीय पथक ः पुरुष एकेरी-मनराज सिंग, आयुष शेट्टी, लोकेश रेड्डी के., गगन. महिला-रक्षिता श्री एस., श्रेया लेले, जिया रावत, आलिशा नाईक. पुरुष दुहेरी-भव्य छाब्रा-परम चौधरी, दिव्यम अरोरा-मयंक राणा. महिला दुहेरी-वेन्नाला के.-श्रेयांशी वालिशेट्टी, वैष्णवी खांडकेकर-सानिया सिकंदर. मिश्र दुहेरी-अरुलमुरुगन आर.-श्रीनिधी एस., सात्विक रेड्डी के.-वैष्णवी खांडकेकर.