दीप्ती शर्मा सामन्यात सर्वोत्तम, रिचा-हरमनप्रीतची निर्णायक भागीदारी, टेलर-कँपबेलीची भागीदारी वाया
वृत्तसंस्था/ केपटाऊन
ऑफस्पिनर दीप्ती शर्माची जादुमय फिरकी, रिचा घोष-हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा यांची समयोचित फलंदाजी यांच्या बळावर भारताने महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील दुसऱया साखळी सामन्यात विंडीजवर 6 गडय़ांनी मात करीत दुसरा विजय नोंदवला. दीप्तीला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळाला.
प्रथम फलंदाजी करणाऱया विंडीजला निर्धारित 20 षटकांत 6 बाद 118 धावांवर रोखल्यानंतर रिचा, हरमनप्रीत यांनी चौथ्या गडय़ासाठी 72 धावांची भागीदारी करीत भारताचा विजय साकार केला. शेफाली व स्मृती मानधना यांनी भारताला 3.3 षटकांतच 32 धावांची जलद सलामी दिली. स्मृती 10 धावा काढून बाद झाल्यानंतर जेमिमाही लगेचच बाद झाली. आक्रमक खेळणारी शेफालीही 28 धावा काढून बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत व रिचा घोष यांनी संयमी खेळ करीत हळूहळू विजयाकडे झेप घेतली. संघाला चार धावांची गरज असताना हरमनप्रीत झेलबाद झाली. तिने 42 चेंडूत 3 चौकारांसह 33 धावा जमविल्या. रिचाने 19 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर विजयी चौकार मारत सामना संपवला. रिचा 32 चेंडूत 44 धावांवर नाबाद राहिली. त्यात 5 चौकारांचा समावेश होता. विंडीजतर्फे करिश्मा रामहरकने 2 तर हेन्री व मॅथ्यूज यांनी एकेक बळी मिळविला.
भारताची पुढील लढत शनिवारी 18 फेब्रुवारी रोजी इंग्लंडविरुद्ध होणार असून या सामन्यात भारतीय संघाचा खरा कस लागणार आहे.
दीप्तीचे टी-20 मध्ये 100 बळी
विंडीजच्या स्टेफानी टेलरने सर्वाधिक 42 धावा जमविल्या. अनुभवी दीप्तीने आपल्या चार षटकांत केवळ 15 धावा देत 3 बळी मिळविले. यातील ऍफी फ्लेचरचा बळी मिळवित तिने टी-20 मधील 100 बळींचा टप्पाही गाठला. टी-20 मध्ये हा टप्पा गाठणारी ती पहिलीच भारतीय गोलंदाज आहे. या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण पूजा वस्त्रकारने आपल्या पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर कर्णधार हेली मॅथ्यूजला केवळ 2 धावांवर बाद करून भारताला सुरुवातीलाच यश मिळवून दिले. जादा बाऊन्स चेंडूवर मॅथ्यूजचा झेल रिचा घोषने टिपला. पूजाने यानंतरही विंडीज फलंदाजांवर दडपण कायम राखत निर्धाव षटक टाकले. शेमेन कँपबेलीने (30) विंडीजचा पहिला चौकार तिसऱया षटकात मारला. तिने रेणुका सिंगला स्क्वेअरलेगच्या दिशेने स्लॅपचा चौकार मारला.
फिरकी मारा सुरू झाल्यानंतर विंडीजने 12 धावां वसूल केल्या. राजेश्वरी गायकवाडच्या षटकात त्यांनी 2 चौकार मारले. दहा षटकाअखेर विंडीजने 1 बाद 53 धावांची मजल मारली होती. कँपबेली व स्टेफानी टेलर (42) यांनी विंडीजचा डाव सावरताना दुसऱया गडय़ासाठी 73 धावांची भागीदारी केली. दोघींनी मिळून एकूण 9 चौकार मारले. मात्र दीप्तीने दोघींना झटपट बाद करून विंडीजला अडचणीत आणले. तिने प्रथम कँपबेलीला रिव्हर्स स्वीपच्या मोहात पाडले. पण तिचा शॉर्ट थर्डमॅनला उडालेला झेल स्मृती मानधनाने टिपला. तीन चेंडूनंतर दीप्तीने टेलरला पायचीत केले. पंचांनी तिला नाबाद दिले होते. पण भारताने रिव्हय़ू घेतल्यानंतर त्यात ती बाद असल्याचे स्पष्ट झाले. कँपबेलीने 36 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 30 धावा केल्या तर टेलरने 40 चेंडूत 6 चौकारांसह सर्वाधिक 42 धावा फटकावल्या.
चिनेली हेन्रीला (2) यानंतर धावचीत होत तंबूत परतावे लागले. मानधना व रिचा घोष यांनी तिला धावबाद केले. भारताने अचूक मारा करीत धावा रोखल्या होत्या. पण क्षेत्ररक्षणात थोडी ढिलाई झाली. दीप्तीने 16 व्या षटकात चेडीयन नेशनचा झेल सोडला.
नेशन व शबिका गजनबी (13 चेंडूत 15) यांनी विंडीजला शंभरी गाठून दिली. शेवटच्या षटकात दीप्तीने फ्लेचरला बाद करून टी-20 मधील शंभरावा बळी नोंदवला. चेडियन 21 धावांवर नाबाद राहिली. तिने 18 चेंडूच्या खेळीत एक चौकार मारला. दीप्तीशिवाय रेणुका सिंग व पूजा वस्त्रकार यांनी एकेक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक
विंडीज 20 षटकांत 6 बाद 118 ः हेली मॅथ्यूज 2, स्टेफानी टेलर 42 (40 चेंडूत 6 चौकार), शेमेन कँपबेली 30 (36 चेंडूत 3 चौकार), हेन्री 2, चेडियन नेशन 21 (18 चेंडूत 1 चौकार), शबिका गजनबी 15 (13 चेंडूत 2 चौकार), फ्लेचर 0, रशदा विल्यम्स नाबाद 2, अवांतर 4.
गोलंदाजी ः दीप्ती शर्मा 3-15, रेणुका सिंग 1-22, पूजा वस्त्रकार 1-21, राजेश्वरी गायकवाड 0-30, देविका वैद्य 0-16. भारत 18.1 षटकांत 4 बाद 119 ः शेफाली वर्मा 28 (23 चेंडूत 5 चौकार), स्मृती मानधना 10 (7 चेंडूत 2 चौकार), जेमिमा रॉड्रिग्स 1, हरमनप्रीत कौर 33 (42 चेंडूत 3 चौकार), रिचा घोष नाबाद 44 (32 चेंडूत 5 चौकार), देविका वैद्य नाबाद 0, अवांतर 3.