तिसऱया व शेवटच्या वनडेत आफ्रिकन संघाचा 7 गडी राखून धुव्वा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
युवा व अननुभवी खेळाडू हाताशी असतानाही शिखर धवनच्या नेतृत्वाखालील दुसऱया फळीतील भारतीय संघाने मंगळवारी दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून फडशा पाडला आणि 3 सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. कुलदीप यादव (4-18), वॉशिंग्टन सुंदर (2-15) व शाहबाज अहमद (2-32) या फिरकी त्रिकुटाने दक्षिण आफ्रिकेचा डाव 99 धावांमध्ये गुंडाळण्यात सिंहाचा वाटा उचलला. प्रत्युत्तरात भारताने 19.1 षटकात 3 गडय़ांच्या बदल्यात सहज विजय मिळवला.
विजयासाठी 50 षटकात 100 धावांचे तुलनेने किरकोळ आव्हान असताना शुभमन गिलने 49 धावांची दमदार खेळी साकारली. त्याने 57 चेंडूंचा सामना करत 8 चौकार फटकावले. या मालिकेतील पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचे पुढील वर्षातील वनडे विश्वचषक स्पर्धेतील थेट एन्ट्री मिळण्याचे स्वप्नही भंगले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारतीय मध्यमगती गोलंदाज मोहम्मद सिराजने 17 धावात 2 बळी घेत सातत्य राखले. शिवाय, टी-20 वर्ल्डकपसाठी मुख्य संघात स्थान मिळण्याची दावेदारी कायम ठेवली. वॉशिंग्टन सुंदर व शाहबाज यांनी आघाडीवीरांना बाद करण्यात मोठा वाटा उचलला तर हॅट्ट्रिक हुकलेल्या कुलदीप यादवने आफ्रिकन संघाची तळाची लाईनअप गुंडाळली. गोलंदाजीतील या पराक्रमामुळेच भारताला पिछाडी भरुन काढत मालिकाविजयावर शिक्कामोर्तब करणे शक्य झाले.
विजयासाठी माफक आव्हान असताना सलामीवीर गिलने दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांवर पहिल्या चेंडूपासूनच आक्रमण चढवले. शिखर धवनने त्याला साथ देण्यावर अधिक भर दिला. भारतीय फलंदाज हा सामना शक्य तितक्या लवकर जिंकण्याच्या प्रयत्नात होते आणि खराब फॉर्ममधील धवन याच प्रयत्नात 8 धावांवर धावचीत झाला. इशान किशन देखील केवळ 10 धावांवर तंबूत परतला.
श्रेयस अय्यरने मात्र नाबाद 28 धावांच्या खेळीत 3 चौकार व 2 षटकार खेचत आफ्रिकन गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. त्यानेच सामना जिंकून देणारा षटकारही खेचला. त्यापूर्वी विजयासाठी 3 धावांची आवश्यकता असताना शुभमन गिल पायचीत झाला होता.
क्लासेनचे सर्वाधिक 34 धावांचे योगदान
प्रारंभी, खराब सुरुवातीनंतर दक्षिण आफ्रिकन संघातर्फे कर्णधार डेव्हिड मिलर व हेन्रिच क्लासेन यांनी थोडाफार प्रतिकार केला. क्लासेनने सर्वाधिक 34 धावा केल्या. पण, दुसऱया बाजूने ठरावीक अंतराने फलंदाज बाद होण्याचा सिलसिला कायम राहिला. क्लासेन व जान्सन यांनी 22 धावांची भागीदारी साकारल्याने दक्षिण आफ्रिकेला 100 धावांच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचता आले. जान्सनने लाँगऑनकडे लक्षवेधी षटकार खेचला. डावाच्या उत्तरार्धात कुलदीपने धमाका सुरु केला आणि यानंतर पाहता पाहता दक्षिण आफ्रिकेचा डाव 27.1 षटकात 99 धावांमध्ये खुर्दा झाला.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका ः 27.1 षटकात सर्वबाद 99 (हेन्रिच क्लासेन 42 चेंडूत 4 चौकारांसह 34, मार्को जान्सन 19 चेंडूत 14, जानेमन मलान 27 चेंडूत 3 चौकारांसह 15. अवांतर 5. कुलदीप यादव 4.1 षटकात 18 धावात 4 बळी, वॉशिंग्टन सुंदर 4 षटकात 2-15, मोहम्मद सिराज 5 षटकात 2-17, शाहबाज अहमद 7 षटकात 2-32).
भारत ः 19.1 षटकात 3 बाद 105 (शुभमन गिल 57 चेंडूत 8 चौकारांसह 49, श्रेयस अय्यर 23 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 28, इशान किशन 18 चेंडूत 2 चौकारांसह 10. अवांतर 8. लुंगी एन्गिडी 5 षटकात 1-21, बियॉर्न फॉर्च्युइन 4 षटकात 1-20).
नाईन पिन्सप्रमाणे कोसळली दक्षिण आफ्रिकन फलंदाजी!
प्रारंभी, दक्षिण आफ्रिकन फलंदाजी ‘नाईन पिन्स’प्रमाणे कोसळत राहिली क्विन्टॉन डी कॉक (6) वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर बॅकवर्ड पॉईंटवरील अवेश खानकडे झेल देत सर्वप्रथम तंबूत परतला. जानेमन मलानने सिराजला लागोपाठ षटकात 3 चौकारासाठी पिटाळले असले तरी त्याला सिराजनेच तंबूचा रस्ता दाखवला. दक्षिण आफ्रिकन फलंदाज सातत्याने झगडत राहिले. सिराजने हेन्ड्रिक्सला 3 धावांवर बाद केले तर एडन मॅरक्रम हा शाहबाज अहमदचा पहिला बळी ठरला होता.