दिव्यांग प्रवाशाला विमानात न बसवल्याप्रकरणी डीजीसीएकडून कारवाई
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिव्यांग प्रवाशाला विमानामध्ये चढू न दिल्याने डीजीसीएने इंडिगोला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यासोबतच इंडिगो एअरलाईन्सला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. 7 मे रोजी इंडिगोने रांची-हैदराबाद फ्लाईटमधून एका दिव्यांग मुलाला काही कारणास्तव प्रवेश दिला नव्हता. यासंबंधीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकारानंतर मुलाला विमानामध्ये चढण्यास भीती वाटत असल्यामुळे त्याची स्थिती आणि सुरक्षितता लक्षात घेऊन एअरलाईन्सने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते.
7 मे रोजी दिव्यांग प्रवासी आपल्या पालकांसह रांची विमानतळावर हैदराबादला जाण्यासाठी विमान पकडण्यासाठी आले होते. यादरम्यान त्यांना इंडिगोच्या रांची-हैदराबाद फ्लाईटमध्ये चढण्यापासून रोखण्यात आले. मुलाच्या पालकांनी विमान कंपनीच्या कर्मचाऱयाला विनवणी करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याचा तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून सहप्रवाशांनीही कंपनीच्या कर्मचाऱयांना फ्लाईटमध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, मात्र कर्मचाऱयाने मुलाला फ्लाईटमध्ये चढू दिले नाही. मुलाला अस्वस्थ आणि भीती वाटत असल्यामुळे पालकही फ्लाईटमध्ये चढले नाहीत, असा दावा कंपनीच्या कर्मचाऱयांनी केला होता. यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे ट्विट केले होते. यासंबंधी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने इंडिगोकडूनही अहवाल मागवला होता. या प्रकरणाच्या चौकशीनंतर विमान कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.