आपल्यापैकी प्रत्येकजण केव्हाना केव्हा सफाई मोहीम हाती घेतलेली असते. आपल्या घरातील अडगळीची खोली म्हणा, स्वयंपाकघर म्हणा, किंवा घराचा परिसर म्हणा, त्याची स्वच्छता करावीच लागते. संडास आणि मोरी तर नेहमी स्वच्छ ठेवावे लागतात. पण अशी स्वच्छता केल्यानंतर आपल्या हातांची स्वच्छता करणे अनिवार्य असते. साबण किंवा तत्सम पदार्थाच्या साहाय्याने हात निर्जंतुक करावे लागतात.
स्वच्छता करुन झाल्यानंतर हात न धुतल्याचा परिणाम किती गंभीर होऊ शकतो याचा अनुभव स्पेनमधील एका माणसाला आला. हा खरोखरच जीवघेणा अनुभव होता. याची दखल न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन या प्रसिद्ध नियतकालिकालाही घ्यावी लागली, इतका हा प्रसंग महत्वाचा आहे. या व्यक्तीने आपल्या घराच्या परिसराची स्वच्छता केल्यानंतर हात स्वच्छ धुतले नाहीत. थोडय़ा वेळाने हाताला प्रचंड खाज सुटली. नंतर एक लाल रंगाचा डाग उठला. आश्चर्य म्हणजे हा डाग सारखी जागा बदलू लागला. त्यामुळे या व्यक्तीने डॉक्टरचा सल्ला घेतला.
डॉक्टरांनी स्कॅनिंग केले असता एक अज्ञात किडा त्वचेखाली असल्याचे दिसले. आजवर असा प्रकार कधी डॉक्टरांच्या पाहण्यात आला नव्हता. लवकरच या किडय़ापासून अनेक छोटे किडे निर्माण झाले आणि ते त्वचेखाली वळवळ करु लागले. औषध घेतल्यानंतर काही काळ सारे काही बरे झाल्यासारखे दिसले. पण हा संसर्ग पुन्हा पुन्हा होत राहीला आहे. त्यामुळे ब्रिटनमधील डॉक्टर्सना या प्रकाराची दखल घ्यावी लागली. अशा प्रकारचा अज्ञात संसर्ग मानवाच्या मृत्यूलाही कारणीभूत होऊ शकतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे उघडय़ा हाताने स्वच्छता करण्यापेक्षा हातमोजे घालावेत. तसेच स्वच्छतेनंतर हात चांगले धुवावेत, असेही आवर्जून सांगण्यात आले आहे. आपल्या सर्वांसाठी हे महत्वाचे आहे.