बेळगाव : बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला असून महिन्याभरापूर्वी आदर्शनगर राम कॉलनी येथील कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचे आज निधन झाले. नागेश यल्लाप्पा कुसाणे (वय68) असे वृद्धाचे नाव असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.
वडगाव स्मशानभूमी समोरील खुल्या जागेकडून घराकडे येत असताना 9 जानेवारी रोजी नागेश यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. या हरल्यात नागेश गंभीर जखमी झाले होते. दरम्यान त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. मात्र, आज सकाळी नागेश यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात, वहिनी, तीन पुतण्या असा परिवार आहे. अवघ्या सहा दिवसांपूर्वीच नागेश यांच्या भावाचा मृत्यू झाला होता.आठवडाभरात घरातील दोन व्यक्तींचे निधन झाल्यामुळे कुसाणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागेश यांच्या निधनाची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी. तसेच कुसाणे कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. अंत्यसंस्कार आज दुपारी होणार आहेत. सोमवार दिनांक 13 रोजी सकाळी रक्षा विसर्जन होणार आहे.