अलारवाड क्रॉसनजीकच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी
वार्ताहर /किणये
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाजवळील हलगा गावाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनधारकांतून होत आहे. तसेच अलारवाड क्रॉसजवळील रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येऊ लागली आहे. येडियुरप्पा रोडपासून हलगा गावाकडे सर्व्हिस रस्ता गेला आहे. मात्र याच वळणाच्या ठिकाणी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहने सर्व्हिस रस्त्यावर येतात. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक धोकादायक बनली आहे. या सर्व्हिस रस्त्यावरून बस्तवाड, हलगा, कोंडुस्कोप व अन्य गावातील वाहनधारकांची वाहतूक असते. त्यामुळे सर्व्हिस रस्त्यावर गतिरोधक बसविल्यास दुर्घटना टळू शकते, असे वाहनधारकांचे म्हणणे आहे. अलारवाड क्रॉसनजीक रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे पुलाखालून येणाऱ्या वाहनधारकांना या खड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. या खड्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करावी
हलगा गावच्या बाजूलाच सुवर्णविधानसौध बांधण्यात आली आहे. तसेच गावाला येणाऱ्या सर्व्हिस रस्त्याच्या बाजूनेच पुणे-बेंगळूर हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गावरून भरधाव वेगाने वाहने जातात. मात्र हलगा गावाकडे जाणाऱ्या (धाब्यानजीक) संपर्क रस्त्यावर गतिरोधक नाही. यामुळे महामार्गावरून थेट सर्व्हिस रस्त्यावर येणारी वाहने सुसाट येत आहेत. त्यामुळे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करून वळनावरील सर्व्हिस रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.
– वासू सामजी, हलगा