जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे निर्देश; पन्हाळा क्रीडा संकुल जमिनीसाठी प्रक्रीया; जलदगतीने करावी; जिल्हा क्रीडा संकुल समिती बैठक
कोल्हापूर प्रतिनिधी
सर्व तालुक्यांमध्ये क्रीडा संकुल उभारण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, पन्हाळा तालुका क्रीडा संकुलासाठी जमीन मिळवण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी येथे संबंधित यंत्रणेला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी, रवी कुमठेकर, उदय सरनाईक, आर. डी. पाटील यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रेखावार यांनी तालुका क्रीडा संकुल सद्यस्थितीची माहिती घेवून कागल, पन्हाळा, शिरोळ, हातकणंगले यथील तालुका क्रीडा संकुलाच्या जागेबाबत आढावा घेतला. पन्हाळा तालुका क्रीडा संकुलासाठी ग्रामपंचायत क्षेत्रात गावालगत समपातळीत असणारी व क्रीडा बाबींसाठी वापरण्यास योग्य किमान 5 ते 6 एकर जमीन आवश्यक आहे. अशी जमीन देऊ इच्छिणारे नागरिक व ग्रामपंचायतींनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दहा दिवसांत प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन करुन नागरिकांकडून उपलब्ध होणाया जागांची जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी तपासणी करुन त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही जलदगतीने करावी, असे निर्देश जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिले.
जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. साखरे यांनी क्रीडा संकुलांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. तसेच जिल्हा क्रीडा संकुलासाठी शेंडा पार्क येथे नवीन जागा मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केल्याचेही त्यांनी सांगितले.
कर्मचार्यांच्या मानधनात दहा टक्क्यांनी वाढ
जिल्हा क्रीडा संकुल मधील मानधन तत्वावर काम करणाया कर्मचायांच्या मानधनात दहा टक्क्यांनी वाढ देण्यास जिल्हाधिकारी रेखावार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिली.
छत्रपती शिवाजी स्टेडियमवर जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करा
जिह्यातील खेळाडूंना शिवाजी स्टेडियम क्रीडांगणावर अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी येथील क्रीडागंण समपातळीत करणे, संरक्षक भिंत बांधणे, प्रेक्षक गॅलरीची दुरुस्ती, क्रीडा संकुलाला उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सध्याच्या गाळ्यांची भाडेवाढ करणे, जाहिरात पॅनलची उभारणी करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करा. तसेच याठिकाणी मोबाईल टॉवर उभारण्यासाठी तसेच बँकांचे ‘एटीएम’ केंद्र उभारण्याबाबत प्रयत्न करा, असे सांगून येथील जलतरण तलाव दुरुस्तीची उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करुन घ्यावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिले.