मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी/पणजी
अंमलीपदार्थ व्यवहाराचे समुळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असले तरीही गोव्यात येणारे आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि मजूर यांच्या माध्यमातून राज्यात अंमलीपदार्थ पोहोचतात, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत व्हर्च्युअल बैठकीत उपस्थित राहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना वरील माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी गोव्यातील नजरकैद केंद्र तसेच हद्दपार करण्याच्या प्रक्रियेची दखल घेतली असून बैठकीस उपस्थित असलेल्या अन्य राज्यांनाही अशीच पद्धती लागू करण्यास सांगितले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
अंमलीपदार्थांची तस्करी रोखण्यासाठी अंमलीपदार्थ विरोधी विभाग सर्वोत्तम प्रयत्न करत आहे. तरीही बस आणि रेल्वे मार्गाने गोव्यात येणारे मजूर गांजा, चरस यासारखे अंमलीपदार्थ सोबत आणतात. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पर्यटकही गोव्यात अमलीपदार्थ आणतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येत आहेत. यासंबंधी केंद्रीय गृहमंत्र्यांनीही आम्हाला मार्गदर्शन केले. त्यावर सखोल चर्चा झाली आणि सर्व राज्यांची मते घेण्यात आली, असे सावंत म्हणाले.
गोव्याच्या नजरकैद केंद्राची दखल घेताना गृहमंत्र्यांनी अन्य राज्यांनीही अशीच केंदे तयार करावी, असे सांगितले. त्याचबरोबर बेकायदेशीररित्या राज्यात राहणाऱया विदेशी लोकांना हद्दपार करण्यासही सांगितले. गोवा सरकारने 2019 पासून 129 विदेशी नागरिकांना हद्दपार केले आहे. सुमारे 700 नायजेरियन बेकायदेशीरपणे राहत होते, त्यापैकी 650 जणांना हद्दपार केले असून केवळ 50 जण शिल्लक राहिले आहेत, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली.