प्रतिनिधी / बेळगाव
मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज
बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेजमध्ये महिला दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. शोभा नाईक उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य एम. डी. हुंदरे होते. व्यासपीठावर प्रा. व्ही. पी. महाजन, एस. एस. गोल्याळकर, प्रा. पी. एम. सुभेदार, सुरेश नाजरे उपस्थित होते. प्रा. महाजन यांनी प्रास्ताविक केले. मंगल कुकडोळकर हिने पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी अंजली जठार, प्रियांका हळब, स्वरुपा जाधव, नकलीताई अवणे यांनी तसेच प्रा. एम. एल. गोल्याळकर यांनी विचार व्यक्त केले. शोभा नाईक यांनी, तुम्ही भावी शिक्षक असून तुम्हाला उत्कृष्ट विद्यार्थी घडवायचे आहेत, असे सांगितले. सूत्रसंचालन रेणूका हावळ हिने केले. सोनाली हुंदरे हिने आभार मानले.
जायंट्स परिवारतर्फे महिलांचा सत्कार
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवारतर्फे महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील पाच महिलांचा सत्कार करण्यात आला. भारतनगर, लक्ष्मी गल्ली येथील महागणपती मंदिरात आयोजित कार्यक्रमात पत्रकार कीर्ती कासरगोड, प्रा. वनिता जोशी, सामाजिक कार्यकर्त्या प्रेमा पाटील, आदर्श महिला विजयमाला मरवे व शिक्षिका सविता चंदगडकर यांचा भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुण्या भारती गुरव यांनी आजच्या युगात महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर असून आपल्या मुलांच्या भवितव्याची जबाबदारी घेऊन त्यांच्यावर चांगले संस्कार रुजवावेत, असे सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून व्यावसायिक नितीन पै उपस्थित होते. प्रारंभी परिवारचे नूतन अध्यक्ष किरण वेसणे यांनी दीपप्रज्वलन केले. राजू माळवदे यांनी जायंट्सच्या कार्याची माहिती दिली. वैष्णवी काकतीकर यांनी परिचय करून दिला. सचिन केळवेकर यांनी आभार मानले.
शेख कॉलेजमध्ये महिला दिन
शेख कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे प्रा. रूपा सकरी यांच्या उपस्थितीत महिला दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. इंदिरा सुतार होत्या. दीपप्रज्वलनानंतर राजकुंवर जाधव यांनी स्वागतगीत सादर केले. प्रा. सकरी यांनी संविधानाने महिलांना दिलेले प्रमुख हक्क आणि अधिकार यांची माहिती दिली. प्रा. सुतार यांनी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधांची माहिती दिली. यानंतर महिला दिनाबाबत चित्रफीत दाखविण्यात आली. आयेशा हिने सूत्रसंचालन केले. उषा डी. बी. यांनी आभार मानले.
वैश्य समाजातर्फे महिला दिन
वैश्य समाज महिला मंडळातर्फे समादेवी संस्थानच्या सभागृहात महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी आपले कला-कौशल्य सादर केले. अर्चना कपिलेश्वरी व सुनीता हणमशेट यांनी खेळ घेतले. उज्वला बैलूर यांनी अध्यक्षीय भाषण केले. लक्ष्मी बिडीकर यांनी आभार मानले. यावेळी मंडळाच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.
हिंडलगा कारागृह
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिला कैद्यांनी भाग घेतला होता. मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून व बालिकेला पुष्प देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महिला आज सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. मुलगी, बहीण, आई म्हणून अनेक नातेसंबंध जपत महिला जीवन जगतात. सर्व आघाड्यांवर पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्यांचा प्रत्येकांनी आदर केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्त्राr समानता, शिक्षण, मिळकतीत वाटणी आदींसाठी झटले. समाजातील वेगवेगळ्या स्तरावर महिलांचे प्रतिनिधीत्व आणखी वाढविण्याची गरज आहे, असे कृष्णकुमार यांनी सांगितले. यावेळी कारागृहाचे प्रशासकीय अधिकारी बी. एस. पुजारी, साहाय्यक अधीक्षक शहाबुद्दीन के., जेलर राजेश धर्मट्टी, जी. आर. कांबळे, एस. एस. यादगुडे आदी उपस्थित होते. ईरव्वा व मंजुळा यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. शशिकांत यादगुडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
महिला आघाडीतर्फे दंततपासणी
महिला आघाडी व इंडियन डेन्टल असोसिएशनतर्फे महिला दिनानिमित्त महिलांची दंत तपासणी करण्यात आली. प्रारंभी अर्चना देसाई यांनी स्वागतगीत सादर केले. संस्थेच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, सचिव सरिता पाटील, माजी नगरसेविका सुधा भातकांडे यांनी दीपप्रज्वलन केले. डॉ. बिंदू होसमनी यांनी प्रतिमा पूजन केले. प्रास्ताविकात रेणू किल्लेकर यांनी महिला दिनाचा इतिहास सांगून महिलांनी स्वावलंबी झाले पाहिजे. स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी स्वतंत्र स्थान निर्माण केले पाहिजे. प्रामुख्याने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असे सांगितले. यावेळी महिला आघाडीच्या सर्व संचालक व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. सरिता पाटील यांनी आभार मानले.
आदर्शनगर महिला मंडळातर्फे महिला
आदर्शनगर येथे अध्यक्षा नेहा जोशी, कार्याध्यक्षा गीता गुरव यांच्या उपस्थितीत महिला दिन साजरा झाला. प्रारंभी सदस्या कारेकर यांनी ईशस्तवन सादर केले. उपाध्यक्षा वर्षा घाडी यांनी स्वागत करून महिला दिनाबद्दल माहिती दिली. नेहा जोशी यांनी महिला सक्षम असून त्या कुटुंब, मुलांचे संगोपन आणि सामाजिक घडण ही त्रिसुत्री सांभाळतात, असे सांगितले. सचिव शीतल घोरपडे यांचेही भाषण झाले. यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
भैरवनाथ महिला मंडळातर्फे महिला दिन
गेंडवाड (ता. बेळगाव) येथील श्री भैरवनाथ महिला स्व-साहाय्य संघाच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला रोहिणी नाथबुवा तसेच भैरवनाथ महिला मंडळाच्या अध्यक्षा सुमन पाटील व गावातील महिलावर्ग उपस्थित होता. रोहिणी नाथबुवा व उपाध्यक्षा सोनम पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले. मधुरा निलजकर यांनी सूत्रसंचालन केले तर रेणूका पाटील यांनी आभार मानले.