हमास कमांडर तैसीर जबरीचा खात्मा ; दोन तासात इस्रायलवरही डागली 100 रॉकेट
तेल अवीव / वृत्तसंस्था
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष सुरूच आहे. इस्रायलने शुक्रवारी रात्री गाझापट्टीत हवाई हल्ले केले. यामध्ये पॅलेस्टिनी संघटना ‘हमास’चा वरि÷ कमांडर तैसीर अल-जबारी याचा खात्मा झाला आहे. या हल्ल्यात गाझामधील 10 ठार झाले असून 70 हून अधिक जखमी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हल्ल्यानंतर पॅलेस्टिनी संघटना हमासनेही गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने दोन तासांत 100 रॉकेट डागले. यापैकी 9 गाझा पट्टीमध्ये कोसळल्याचे दिसून आले आहे.
पॅलेस्टाईन संघटना वेस्ट बँक नेते बहा अबू अल-अता यांना अटक करून मारल्याच्या प्रत्युत्तरात इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी देत होती. 2019 मध्ये इस्रायली सैन्याने अल-अताचा खात्मा केला होता. या धमकीनंतर इस्रायलने हवाई हल्ला केला. हवाई हल्ल्यात हमासचे किमान 15 दहशतवादी मारले गेले आहेत.
मध्यपूर्वेच्या या प्रदेशात हा संघर्ष किमान 100 वर्षांपासून सुरू आहे. वेस्ट बँक, गाझा पट्टी आणि गोलन हाईट्स यांसारख्या क्षेत्रांवर वाद आहेत. या भागांसह पूर्व जेरुसलेमवर पॅलेस्टाईनचा दावा आहे. त्याचवेळी इस्रायल जेरुसलेमवरील आपला दावा सोडायला तयार नाही. गाझा पट्टीचा भाग इस्रायल आणि इजिप्त यांच्यामध्ये आहे. त्यावर सध्या हमासचा ताबा असून हा इस्रायलविरोधी गट आहे. सप्टेंबर 2005 मध्ये इस्रायलने गाझापट्टीतून आपले सैन्य मागे घेतले. 2007 मध्ये इस्रायलने या भागावर अनेक निर्बंध लादले होते. पॅलेस्टाईनने वेस्ट बँक आणि गाझा पट्टीमध्ये स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्य स्थापन करण्याची मागणी केली आहे.