नाममात्र दरात वास्तव्यसुविधा
एक सुंदर घर खरेदी करण्याचे स्वप्न सर्वांचेच असते, परंतु माणसाला स्वतःच्या बजेटनुसार फ्लॅट किंवा छोटय़ा घरावरच समाधान मानावे लागते. अशा स्थितीत जर कुणी तुम्हाला तयार घर नाममात्र भाडय़ात देत असल्यास काय वाटेल? इटलीतील एका गावात अशाचप्रकारची ऑफर देण्यात येत आहे.
रोमपासून काही तासांच्या अंतरावर असलेले इटालियन गाव पेत्रितोलीमध्ये स्वीमिंग पूल, किल्ला आणि वास्तव्याची उत्तम ठिकाणे आहेत, या सर्व सुखसुविधा तुम्हाला केवळ 1 हजार रुपये प्रतिदिनाच्या हिशेबाने मिळू शकतात. हे छोटेसे गाव एड्रियाटिक कोस्टनजीक असून नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे.
समुद्रसपाटीपासून 300 मीटरच्या उंचीवर असलेले पालाझ्झो मन्नोच्ची तुम्हाला सुंदर नैसर्गिक सौंदर्य अन् गावांना पाहण्यासाठी आमंत्रित करत असल्याचे ग्रॅम अकॉमोडेशनच्या वेबसाइटवर नमूद आहे. या गावात स्वतःचा स्वीमिंग पूल अन् गार्डन आहे. तसेच किल्ल्यातील महालात वास्तव्याची शाही व्यवस्था आहे. रेस्टॉरंट, बार अन् सुपरमार्केट देखील गावातच आहे. या ठिकाणी 200 लोक सहजपणे राहू शकतात. कारण येथे 98 बेडरुम आहेत. 150 लोकांचा समूह 6 रात्रींसाठी थांबत असल्यास 10 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. या हिशेबाने प्रतिव्यक्ती एक हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.
ही एकच अशी ऑफर नसून दक्षिणपूर्व इटलीच्या प्रेसिस शहराच्या अधिकाऱयांनी शहरात रिकामी पडलेली घरे खरेदी करण्यासाठी आणि त्यात स्थायिक होण्यासाठी 25 लाख रुपये खर्च करावे लागणार असल्याचे म्हटले आहे. या योजनेच्या अंतर्गत 1991 पूर्वी रिकामी ठरलेल्या घरांमध्ये लोकांना पुन्हा वसविण्याची तयारी आहे. काही काळापूर्वी कलॅब्रियामध्ये स्थायिक होण्यासाठी सरकारने 24.76 लाख रुपयांची ऑफर लोकांना दिली होती.