पुणे / प्रतिनिधी :
देशातील सर्वात मोठी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन २०२३ च्या सत्र १ परीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जाहीर केला. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना एनटीए जेईईच्या अधिकृत संकेतस्थळावरून निकालाची प्रत घेता येणार आहे. देशभरातील टॉपर विद्यार्थ्यांची प्रवर्गानुसार यादी एनटीएच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जेईई मेनची सत्र १ परीक्षा २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेण्यात आली होती. यासाठी देशभरातून ९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ६ लाख मुले व अडीच लाख मुलींनी ही परीक्षा दिली. जेईई सत्र २ ची नोंदणी लगेच सुरू होणार आहे. सत्र २ साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ मार्च २०२३ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
जेईई मेन परीक्षा १३ भाषांमध्ये (इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड,मल्याळम, मराठी,ओडिसा, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू) घेण्यात आली. दुसऱ्या सत्राच्या परीक्षा एप्रिल महिन्यात साधारणपणे ६, ७, ८, ९, १०, ११ आणि १२ एप्रिल रोजी घेतल्या जातील.
अधिक वाचा : रेपो रेटमध्ये 0.25 बेसिस पॉईंट्सची वाढ; EMI वाढणार