वृत्तसंस्था/ नागपूर
हैदराबादमध्ये सुरू असलेल्या यूटीटी राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत जेनिफर व्हर्गिसने महिला एकेरीत सनसनाटी विजय मिळविताना तीन वेळची राष्ट्रीय चॅम्पियन सुतीर्था मुखर्जीला पराभवाचा धक्का दिला.
14 वर्षीय जेनिफर ही यू-17 मुलींच्या विभागाची चॅम्पियन असून तिने द्वितीय मानांकित सुतीर्थावर महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत 15-13, 11-8, 12-10 असा पराभव करून आगेकूच केली. पहिला गेम तिने चौथ्या गेमपॉईंटवर जिंकला. दुसऱ्या गेममध्येही तिने हा जोम कायम राखत सुतीर्थाचे आव्हान संपुष्टात आणले.
यू-17 मुलींच्या अंतिम लढतीत जेनिफरने उत्तर प्रदेशच्या अवनी त्रिपाठीचा 11-7, 11-6, 12-10 असा पराभव करून या मोसमातील पहिले राष्ट्रीय मानांकन जेतेपद पटकावले. त्याआधी उपांत्य फेरीत जेनिफरने नंदिनी साहाचा 10-12, 11-4, 5-11, 11-6, 12-10 असा पराभव केला होता. ‘यू-17 जेतेपद मिळविल्याचा खूप आनंद वाटतो. कारण अर्ध्या तासापूर्वीच यू-19 स्पर्धेत मी अवनीकडून उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाले होते. तिच्यावर 3-0 असा विजय मिळविता आल्याने मी खूप समाधानी आहे,’ असे जेनिफर नंतर म्हणाली.
सुतीर्थाला हरविल्यानंतर जेनिफरला महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पीएसपीबीच्या अर्चना कामतकडून 7-11, 11-8, 3-11, 5-11 असा पराभव स्वीकारावा लागला.