ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर महिलेच्या विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आव्हाडांच्या गुन्ह्याचं सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध आहे. हे फुटेज पाहून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आव्हाडांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे.
पुण्यात पत्रकारांशी ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जाणीवपूर्वक गुन्हे दाखल झालेले नाहीत. सर्व घटना सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद आहे. राष्ट्रवादीत नैतिकता असेल तर शरद पवारांनी आव्हाडांचा राजीनामा घ्यावा. आव्हाड यांची स्टंटबाजी यापुढे चालणार नाही. कारण आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील नाही, तर देवेंद्र फडणवीस आहेत. तसेच कोणी आव्हाड यांचे समर्थन करत असेल तर त्यांना पण गुन्ह्यात घ्यायला हवं. असंही ते म्हणाले.
अधिक वाचा : ‘मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय’; आव्हाडांच्या ट्विटने खळबळ
पवार कुटुंबावर बोलताना ते म्हणाले, पवार कुटुंबियांनी बारामतीमध्ये 69 वर्ष सत्ता आणि सरकार चालवलं म्हणजे उपकार केले नाही. पवार कुटुंबियांच्या दहशतीखाली राहणं काही आमदारांना आवडत नव्हतं म्हणून ते शिंदेंसोबत गेले. दरम्यान, शिंदे गट-भाजप सध्या एकत्र आहे. येत्या काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही एकत्रितपणे निवडणूका लढवणार आहोत, असेही बावनकुळेंनी सांगितले.