वृत्तसंस्था/ बेंगळूर
क्वालालंपूर येथे मंगळवार 5 डिसेंबरपासून विश्व हॉकी फेडरेशनच्या पुरूषांच्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत भारतीय कनिष्ठ पुरूष संघ निश्चितच दर्जेदार कामगिरी करेल, असा विश्वास हॉकी इंडियाने व्यक्त केला आहे. या स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाच्या उपकर्णधारपदी अर्जितसिंग हुंडालची नियुक्ती करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी शनिवारी भारतीय हॉकी संघ बेंगळूरहून क्वालालंपूर रवाना झाला. भारताचा या स्पर्धेतील पहिला सामना मंगळवार 5 डिसेंबर रोजी कोरियाबरोबर होत आहे. भुवनेश्वरमध्ये यापूर्वी झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेपासून भारतीय संघाच्या कामगिरीमध्ये सातत्याने सुधारणा जानवत आहे. भारतीय संघाने 2022 ची सुल्तान ऑफ जोहोर चषक हॉकी स्पर्धा तर त्यानंतर कनिष्ठांची आशिया चषक स्पर्धा जिंकली आहे. नुकत्याच झालेल्या सुल्तान ऑफ जोहोर चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
क्वालालंपूरमध्ये होणाऱ्या या महत्त्वाच्या स्पर्धेत भारताचा क गटामध्ये समावेश आहे. या गटात स्पेन, कोरिया आणि कॅनडा तर अ गटामध्ये माजी विजेते अर्जेटिना, चिली, ऑस्ट्रेलिया व यजमान मलेशिया यांचा सहभाग आहे. ब गटात जर्मनी, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका आणि इजिप्त तर ड गटात नेदरलँड्स, न्यूझीलंड, बेल्जियम व पाकिस्तान यांचा समावेश आहे. 2021 साली भुवनेश्वरमध्ये झालेल्या कनिष्ठ पुरूषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मलेशियातील होणाऱ्या या स्पर्धेत भारताचा दुसरा सामना 7 डिसेंबरला स्पेन बरोबर तर 9 डिसेंबरला कॅनडा बरोबर होत आहे. या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरित प्रवेश मिळविण्यासाठी भारताला क गटातून पहिल्या दोन स्थानामध्ये रहावे लागेल. उत्तमसिंगकडे भारतीय संघाचे नेतृत्त्व सोपविण्यात आले आहे. भारतीय संघात सुखविंदर आणि रावत यांचा समावेश करण्यात आला आहे.