शिक्षेच्या विरोधात रस्त्यांवर उतरले लोक
वृत्तसंस्था/ अंकारा
तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगान यांच्या विरोधक असणाऱया महिला नेत्या जनान कफ्तानजोलू यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे. या शिक्षेच्या विरोधात तुर्कस्तानातील लोक मोठय़ा संख्येत रस्त्यांवर उतरले असून त्यांनी महिला नेत्याचे समर्थन केले आहे. इस्तंबूलसह देशाच्या विविध भागांमध्ये कफ्तानजोलू यांच्या समर्थनार्थ मोठय़ा सभा घेण्यात आल्या आहेत. अशाच एका रॅलीत कफ्तानजोलू स्वतः देखील दिसून आल्या होत्या.
कफ्तानजोलू यांना आधुनिक तुर्कस्तानचे निर्माते म्हणून ओळख असलेल्या मुस्तफा कमाल पाशा यांचा राजकीय वारस ठरविले जात आहे. तर धार्मिक कट्टरतेला खतपाणी घालणारे एर्दोगान हे मुस्तफा यांच्या धोरणांना दूर लोटत आहेत.
10 वर्षे जुन्या ट्विटवर शिक्षा
तुर्कस्तानच्या विरोधी पक्षाच्या नेत्या जनान कफ्तानजोलू यांना एर्दोगान यांच्या राजकीय विरोधक मानले जाते. कफ्तानजोलू यांना एर्दोगान यांच्या अवमानाप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा त्यांना त्यांच्या 10 वर्षे जुन्या एका ट्विटवरून सुनावण्यात आली आहे. परंतु त्यांची शिक्षा सध्या स्थगित करण्यात आली आहे.
धर्मनिरपेक्षतेच्या समर्थक
कफ्तानजोलू या तुर्कस्तानातील धर्मनिरपेक्ष रिपब्लिकन पीपल्स पार्टीच्या (सीएचपी) नेत्या आहेत. दुसरीकडे एर्दोगान हे तुर्कस्तानात धार्मिक कट्टरतेला चालना देत असल्याचे मानले जाते. एर्दोगान यांनी काही दिवसांपूर्वी एक जुना चर्चे हागिया सोफियाला मशिदीत रुपांतरित केले होते. 50 वर्षीय कफ्तानजोलू यांच्या नेतृत्वात 2019 मध्ये इस्तंबूलच्या महापौर निवडणुकीत सीएचपीने मोठा विजय मिळविला होता. इस्तंबुलमध्ये एर्दोगान यांचा पक्ष 25 वर्षांपासून सत्तेवर होता. 2013 च्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये कफ्तानजोलू यांनी मोठी भूमिका पार पाडली होती. एर्दोगान हे कफ्तानजोलू यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे घाबरल्याची चर्चा आहे. कफ्तानजोलू यांनी स्वतःवर झालेले हे आरोप राजकीयदृष्टय़ा प्रेरित असल्याचे म्हटले आहे. तुर्कस्तानला धर्मनिरपेक्ष आणि जागतिक वादांपासून दूर ठेवण्याची त्यांची भूमिका आहे.