वार्ताहर /किणये
कणबर्गी गावातील दोघा वारकऱयांनी कणबर्गी ते पंढरपूर सायकलवरून वारी करण्याचा संकल्प केला. त्यानुसार रविवारी सकाळी गावातील विठ्ठल रखुमाई मंदिर येथून सिद्राय निंगाप्पा होणगेकर व मोहन वाकोबा होडगेकर या दोघांनी सायकलवरुन पंढरपूरला प्रस्थान केले आहे.
सिद्राय होणगेकर हे गेल्या 21 वर्षापासून पंढरीची वारी करतात तसेच मोहन होडगेकर हे गेल्या 16 वर्षापासून पंढरीची वारी करतात. या दोघांनीही गावातील पायी दिंडीमध्ये सहभाग घेतलेला आहे. त्याचबरोबर रेल्वे टेम्पो या वाहनातूनही पंढरपूरला गेलेले आहेत. यापूर्वी दुचाकीवरून पंढरपूरचा प्रवास केलेला आहे. सायकलवरून प्रवास करण्याचा आम्ही दोघांनी संकल्प केला असून त्यानुसार आम्ही रविवारी सकाळी गावातून मार्गस्थ झालो आहे अशी माहिती त्या वारकऱयांनी दिली
विठ्ठल रखुमाई मंदिरात विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर आरती करून ‘त्या’ दोघा वारकऱयांना शुभेच्छा दिल्या. यावेळी धोंडिबा मुतगेकर, मारुती मुचंडीकर, आप्पाजी सुंठकर, बसवाणी भंडरगाळी आदी उपस्थित होते.
या दोन्ही वारकऱयांसोबत गावातील एक दुचाकी वाहन त्यांच्या सोबतीला पाठविण्यात आले आहे. या दुचाकीवर धोंडिबा मुतगेकर व अन्य एक वारकरी आहे.