उत्रे/ प्रतिनिधी
पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील कासारी पाणलोट क्षेत्रात दोन दिवस पडणाऱ्या दमदार व आज पडणारा पावसामुळे कासारी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून यंदा प्रथमच कासारीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. उत्रे परिसरात पाणी पात्राबाहेर पडले असुन नदी काठावरील पिके पाण्याखाली गेली आहेत.तसेच नदीवरील आळवे ठाणे, यवलुज,तिरपण,आदिसह सर्वच बंधारे पाण्याखाली गेले आहेत.त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे.पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरु आहे.दरम्यान पन्हाळा तालुका तहसीलदार माधवी शिंदे यांनी माजगाव पोर्ले दरम्यानच्या पुलावरून संभाव्य पूरस्थितीची पाहणी करून यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला आहे यावेळी परिसरातील ग्रामस्थ यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
यंदा जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात दमदार पावसाला सुरुवात झाली. काही दिवस पावसाची उघडझाप सुरु होती . मात्र दोन दिवसा पासून पावसाचा जोर वाढला.या परिसरात बुधवारी पहाटेपासून पावसाने झोडपून काढले.परिणामी ओढे, नाले, विहिरी तुडुंब भरून वाहू लागले आहेत.कासारीचे पाणी यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पात्राबाहेर पडले आहे.नदीकाठावरील सखल भागातील ऊस तसेच ,गवताची कुरणे पाण्याखाली गेली आहेत.काही ठिकाणी ग्रामस्थांनी जाळे लावून मासेमारी केली. पावसाचा जोर अधिक असल्याने ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले. शेती काम ठप्प झाली आहेत.तसेच कोतोली फाटा ते नांदगाव या नव्या रस्त्यावर चिखल व घसरगुंडी झाली आहे.यामुळे वाहने सावकाश चालवावी लागत आहेत. पावसाच्या सरी जोरदार कोसळत आहेत. ओढे नाले प्रवाहित झाले ने अनेक ठिकाणी शेती चे नुकसान झाले आहे.