आरपीडी महाविद्यालयात आज मतमोजणी : सकाळी 8 पासून सुरुवात, प्रशासन सज्ज, निकालाकडे साऱ्यांच्या नजरा, उत्सुकता शिगेला
बेळगाव : विधानसभा मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व ती तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील 18 मतदारसंघांतील मतमोजणी आरपीडी महाविद्यालयामध्ये होणार आहे. सकाळी 8 पासून मतमोजणीला प्रारंभ होणार असून जिल्हा प्रशासनाने गेल्या दोन दिवसांपासून सर्व तयारी केली आहे. यावेळी मोठ्या चुरशीने मतदान झाले असून 187 जणांचे भवितव्य मशीनबंद आहे. शनिवारी कोणाच्या बाजूने कौल लागणार आहे, हे समजणार आहे. याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बेळगाव हा सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात एकूण 39 लाखांहून अधिक मतदार आहेत. त्यामुळे मतमोजणी करण्यासाठी अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी आकड्यांची जुळवाजुळव केली आहे. सारेच उमेदवार व समर्थक आम्ही विजयी होणार म्हणून सांगत आहेत. पण आता साऱ्यांचे भवितव्य शनिवारी ठरणार आहे. त्यामुळे कोणाची बेरीज पक्की आणि कोणाची कच्ची हे समजणार आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच उमेदवार प्रचारामध्ये गुंतले होते. उन्हाची तमा न बाळगता मतदारांच्या गाठीभेटी घेत होते. भरउन्हात पायी चालून सारेच जण थकले. त्यामुळे बुधवारी झालेल्या मतदानानंतर अनेकांनी विश्र्रांती घेणेच पसंत केले.
तर काहीजण आपल्या नेहमीच्या कामामध्ये गुंतले होते. उमेदवार आपल्याला कोणत्या ठिकाणी मतदान झाले, कोणत्या ठिकाणी झाले नाही, याची कार्यकर्त्यांकडून माहिती घेत होते. या सर्वांचेच भवितव्य पेटीबंद झाले आहे. ते शनिवारी उघडणार आहे. कोण किती मतांनी येणार याबाबत तर्कवितर्क करताना दिसत आहेत. गुलाल आपलाच, असे सांगत आहेत. या उत्साहीपणाबद्दलही जोरदार चर्चा रंगली आहे. शनिवारी दुपारनंतर एकंदरीत चित्र स्पष्ट होणार आहे. काहीजणांचा विजय तर काहीजणांना पराभव स्वीकारावा लागणार, हे निश्चित आहे. आरपीडी महाविद्यालयात जिल्ह्यातील सर्व 18 मतदारसंघांची मतमोजणी होणार असल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व ती तयारी केली आहे. आरपीडी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. आरपीडी महाविद्यालयाच्या स्ट्राँगरूमध्ये सर्व मतदारसंघांतील ईव्हीएम यंत्रे ठेवण्यात आली आहेत. राज्यातील सर्वाधिक मतदानाची मतमोजणी करणारे आरपीडी महाविद्यालय ठरणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. प्रथम पोस्टल मतदान मोजले जाणार आहे. त्यानंतर 8.30 वाजता ईव्हीएम मशीनद्वारे मतदान मोजले जाणार आहे. एका मतदारसंघासाठी 11 टेबल ईव्हीएम मतमोजणीसाठी तर पोस्टलसाठी दोन टेबल ठेवण्यात आले आहेत. मतमोजणीसाठी 1188 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 360 मायक्रोऑब्झर्वर देखील नेमण्यात आल्याचे सांगण्यात आले.
उमेदवारांसह केवळ पोलिंग एजंटना प्रवेश
उमेदवारांच्या पोलिंग एजंटना पास देण्यात आले आहेत. त्यांनाच तेवढा प्रवेश दिला जाणार आहे. इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या परिसरात 144 कलम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे मतदान केंद्रांपासून 200 मीटरपर्यंतच्या कार्यक्षेत्रात कोणालाही प्रवेश असणार नाही. विजयोत्सव साजरा करण्यासाठी 200 मीटर दूरवरच करावा लागणार आहे. या मतमोजणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. केंद्रीय सीमा सुरक्षा दलाच्या तुकड्यांबरोबरच, राज्य राखीव दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात येणार आहेत. या विधानसभा निवडणुकीसाठी 187 जण निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य आज स्पष्ट होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयोत्सव मिरवणूक काढता येणार नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
आरपीडी महाविद्यालयात खालीलप्रमाणे मतमोजणी होणार
- इमारत खोली क्रमांक मतदारसंघ
- न्यू बिल्डिंग तळमजला-खोली क्रमांक 6 रायबाग
- न्यू बिल्डिंग पहिला मजला-खोली क्रमांक 10 यमकनमर्डी
- न्यू बिल्डिंग पहिला मजला-खोली क्रमांक 16 बैलहोंगल
- पऊळेकर बिल्डिंग तळमजला-खोली क्रमांक 04 कागवाड
- पऊळेकर बिल्डिंग पहिला मजला-खोली क्रमांक 07 हुक्केरी
- पऊळेकर बिल्डिंग दुसरा मजला-खोली क्रमांक 14 खानापूर
- लायब्ररी इमारत पहिला मजला-खोली क्रमांक 01 निपाणी
- लायब्ररी इमारत पहिला मजला-खोली क्रमांक 18 रामदुर्ग
- लायब्ररी इमारत दुसरा मजला-खोली क्रमांक 17 सौंदत्ती-यल्लम्मा
- लायब्ररी इमारत दुसरा मजला-खोली क्रमांक 03 अथणी
- लायब्ररी इमारत दुसरा मजला-खोली क्रमांक 12 बेळगाव दक्षिण
- घोटगे बिल्डिंग तळमजला-खोली क्रमांक 05 कुडची
- घोटगे बिल्डिंग पहिला मजला-खोली क्रमांक 15 कित्तूर
- बीबीए बिल्डिंग दुसरा मजला-खोली क्रमांक 8 अरभावी
- घोटगे बिल्डिंग दुसरा मजला-खोली क्रमांक 11 बेळगाव उत्तर
- लायब्ररी बिल्डिंग तळमजला-खोली क्रमांक 09 गोकाक
- बीबीए बिल्डिंग तळमजला-खोली क्रमांक 02 चिकोडी-सदलगा
- बीबीए बिल्डिंग पहिला मजला-खोली क्रमांक 13 बेळगाव ग्रामीण
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश
कायदा-सुव्यवस्था राखण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
शनिवार दि. 13 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळपासूनच बेळगावसह संपूर्ण जिल्ह्यात सीआरपीसी कलम 144 अन्वये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. शुक्रवार दि. 12 मे सायंकाळी 5 पासून रविवार दि. 14 मे सकाळी 7 पर्यंत सीआरपीसी 1973 च्या कलम 144, कर्नाटक पोलीस कायदा 1963 च्या कलम 35 अन्वये जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. याकाळात पाचहून अधिकजण गटागटाने फिरणे, राजकीय सभा, बैठका, मिरवणूक काढणे आदींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने जमावबंदीचा आदेश जारी केला असून याकाळात लाठ्या-काठ्या, भाले, तलवारी, गदा, बंदूक, चाकू किंवा मानवी जीवाला अपायकारक ठरेल, अशी कोणतीही शस्त्रs घेऊन फिरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. दगड, घातक रसायने, स्फोटके आदी मतमोजणीच्या ठिकाणी नेण्यास पूर्णपणे बंदी आहे. दगडफेक करण्यासाठी वापरली जाणारी साधनेही नेण्यास बंदी आहे. प्रतिकृतींची मिरवणूक, प्रतिकृती जाळणे, प्रक्षोभक वक्तव्ये करणे, प्रक्षोभक गाणी वाजविणे, एखाद्याचा अपमान होईल असे चित्र, चिन्हे, प्रतिकृतींचे प्रदर्शन करणे, नैतिकता, कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होईल, अशी कोणतीही कृत्ये करण्यास निर्बंध असणार आहेत. अंत्यसंस्कार, लग्न व धार्मिक मिरवणुकांसाठी हा आदेश लागू असणार नाही.