खर्च निरीक्षक हरक्रिपाल खटाणा यांची माध्यम विभागाला सूचना
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघातील खर्च निरीक्षकांनी वार्ताभवन येथील माध्यम विभागाला भेट देऊन पाहणी केली. प्रसार माध्यमांवर नजर ठेवण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली. यावेळी लोकसभा मतदारसंघातील खर्च निरीक्षक हरक्रिपाल खटाणा म्हणाले, वृत्तपत्र, टीव्ही चॅनेल, सोशल मीडियावर प्रसिद्ध होणाऱ्या निवडणुकीच्या प्रत्येक बातमीवर, जाहिरातीवर नजर ठेवण्यात यावी. राष्ट्रीय पक्षांकडून अथवा उमेदवारांकडून निवडणूक संदर्भातील जाहिराती प्रसिद्ध केल्यास साहाय्यक खर्च नोडल अधिकाऱ्यांनी याची माहिती त्वरित द्यावी. याबरोबरच आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास अशा विषयांची माहिती एमसीसी नोडल अधिकाऱ्यांना द्यावी, असे त्यांनी सांगितले. माध्यम दृढीकरण आणि निरीक्षण समितीच्या कार्यप्रणालीला माहिती दिली जाते. याबरोबरच प्रत्येक वृत्तपत्र, टीव्ही चॅनेल व सोशल मीडियावर नजर ठेवण्यात आली असल्याचे नोडल अधिकारी गुरुनाथ कडबूर यांनी सांगितले. बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक नृसिंहराव बी., चिकोडी मतदारसंघाचे खर्च निरीक्षक एन. मोहनकृष्णा, अंकित तिवारी, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला आदी उपस्थित होते. माध्यम विभागाचे प्रभारी झेड. जी. सय्यद, व्ही. एम. कंग्राळकर, एम. एम. पाटील, एस. एस. घोरपडे आदी उपस्थित होते.