श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममधील चेन देवसर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत रविवारी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. ठार झालेला हैदर हा पाकिस्तानी असून तो दहशतवादी संघटनेचा कमांडर होता. त्याचा सुरक्षा दल बराच काळापासून शोधत होते. हैदरचा खात्मा हे सुरक्षा दलाचे मोठे यश मानले जात आहे. या चकमकीत ठार झालेल्या दुसऱया दहशतवाद्याचे नाव शाहबाज शाह असे असून तो काश्मीरचा रहिवासी होता. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे.
जैश-ए-मोहम्मदचे दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली होती. लष्कर आणि पोलिसांची ही संयुक्त कारवाई होती. दहशतवाद्यांकडून एक एके-47, एक पिस्तूल, अनेक ग्रेनेड सापडले आहेत. यापूर्वी 6 मे रोजी पहलगाममध्ये 3 हिजबुल दहशतवाद्यांना जवानांनी ठार केले होते. गुप्तचर विभागाच्या सूचनेनंतर शनिवारी उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्हय़ात दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यात आली. यापूर्वी कुलगाममध्येच काही दिवसांपूर्वी सतीश कुमार सिंग या नागरिकाची हत्या झाली होती.