आयपीएल 16 : अभिषेक शर्मा, क्लासेन यांचीही फटकेबाजी, आंद्रे रसेलचे 3 बळी
वृत्तसंस्था/ कोलकाता
सलामीवीर हॅरी ब्रुकने आपला दर्जा दाखवत नोंदवलेले या मोसमातील पहिले शतक आणि कर्णधार एडन मार्करमचे अर्धशतक तसेच अभिषेक शर्मा व हेन्रिक क्लासेन यांनी केलेली फटकेबाजी यांच्या बळावर सनरायजर्स हैदराबादने आयपीएलमधील साखळी सामन्यात निर्धारित 20 षटकांत 4 बाद 228 धावांचा डोंगर उभा केला. या मोसमातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
इंग्लंडचा हॅरी ब्रुक याआधीच्या सामन्यात विशेष चमक दाखवू शकला नव्हता. पण या सामन्यात त्याची पुरेपूर भरपाई करीत शतकालाच गवसणी घातली. तो 100 धावांवर नाबाद राहिला. कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून सनरायजर्सला प्रथम फलंदाजी दिली. हॅरी ब्रुकने प्रारंभापासूनच आक्रमक खेळ करीत मयांक अगरवालसमवेत 25 चेंडूतच 46 धावांची भागीदारी केली. त्याने पहिल्या तीन षटकांत 4 चौकार, 2 षटकार ठोकले. अगरवाल (13 चेंडूत 9) पहिल्या गड्याच्या रूपात बाद झाला. रसेलने त्याला वरुण चक्रवर्तीकरवी झेलबाद केले. नंतर आलेला राहुल त्रिपाठीही जास्त वेळ टिकला नाही. रसेलनेच त्याला गुरबाजकरवी झेलबाद केले. त्याने 4 चेंडूत 9 धावा केल्या. यावेळी सनरायजर्सची 5 षटकांत 2 बाद 57 अशी स्थिती होती.
ब्रुकला कर्णधार एडन मार्करमकडून चांगली साथ मिळाली. या दोघांनी चौफेर फटकेबाजी करीत तिसऱ्या गड्यासाठी 47 चेंडूत 72 धावा झोडपल्या. मार्करम अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बाद झाला. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर तो शार्दुल ठाकुरकरवी झेलबाद झाला. त्याने 26 चेंडूत 2 चौकार, 5 षटकारांच्या मदतीने 50 धावा फटकावल्या. ब्रुकने नंतर अभिषेक शर्माच्या साथीने फटकेबाजी पुढे सुरू ठेवली आणि 19 व्या षटकात संघाचे द्विशतकही फलकावर लागवले. ब्रुकने चौथ्या गड्यासाठीही अभिषेकसमवेत 32 चेंडूत 72 धावा झोडपल्या. 19 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर अभिषेक उत्तुंग फटका मारताना रसेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. रसेलचा हा तिसरा बळी ठरला. ब्रुक व क्लासेन यांनी नंतर उर्वरित 11 चेंडूत 27 धावांची भर घालत आयपीएलच्या या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या आपल्या संघाला गाठून दिली. ब्रुकने 55 चेंडूत 12 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 100 धावा फटकावल्या तर अभिषेकने 17 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 32 व क्लासेनने 6 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह नाबाद 16 धावा तडकावल्या. केकेआरच्या रसेलने तीन बळी टिपले तर एक गडी वरुण चक्रवर्तीने बाद केला.
संक्षिप्त धावफलक : सनरायजर्स हैदराबाद 20 षटकांत 4 बाद 228 : हॅरी ब्रुक नाबाद 100 (55 चेंडूत 12 चौकार, 3 षटकार), अगरवाल 9, राहुल त्रिपाठी 9 (4 चेंडूत 2 चौकार), मार्करम 50 (26 चेंडूत 2 चौकार, 5 षटकार), अभिषेक शर्मा 32 (17 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), हेन्रिच क्लासेन नाबाद 16 (6 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), अवांतर 12. गोलंदाजी : आंद्रे रसेल 3-22, वरुण चक्रवर्ती 1-41.