चंदगड पोलिसात तक्रार, संशयित आरोपी ताब्यात
चंदगड /प्रतिनिधी
तिलारीनगरच्या बाजूला असलेल्या गुळंब येथे मुलाकडून बापाचा खून झाल्याची फिर्याद दुस्रया मुलाने चंदगड पोलिसात दिल्याने खळबळ उडाली असून खून झालेल्या व्यक्तीचे नाव राजू सट्टू दळवी (वय.54) असे आहे. संशयित रोहित राजू दळवी यास चंदगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वैभव राजू दळवी हे सध्या सातारा जिह्यातील चिंचणी येथे कामास आहेत. काल रात्री त्यांच्या बहिणीचा सासऱ्याने म्हणजेच सिताराम गावडे यांनी वडिलांची तब्येत खराब झाली असून तातडीने निघा, असा निरोप काल रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी फोन करून दिला. त्यानुसार वैभव दळवी रात्रीच खाजगी वाहनाने निघून पहाटे चार वाजता चंदगड येथे पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर वडील मयत असल्याची माहिती सिताराम गावडे यांच्याकडूनच त्यांना मिळाली. मृतदेह चंदगडच्या ग्रामीण रुग्णालयात असल्याचे समजतात वैभव दळवी तिथे गेले असता मयताच्या चेहयावर ओरबडल्याच्या जखमा दिसत होत्या. तसेच गळ्याभोवती काळा डाग दिसत होता. वैभव आपला भाऊ रोहित याच्याकडे वडिलांच्या मृत्यूची चौकशी करीत असताना रोहित कडून त्याला समाधानकारक माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यानेच गळा आवळून घातपात केला असल्याची फिर्याद चंदगड पोलिसात दिली. त्यानुसार चंदगड पोलिसांनी तपास केला असता रोहित दळवी याने आपणच खून केल्याचे कबूल केले. तथापि अद्याप खून करण्यामागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. संशयित रोहित दळवी यास चंदगड पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे करीत आहेत.