कोल्हापूर प्रतिनिधी
जीएसटी भरला नाही म्हणून कारवाई न करण्यासाठी 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती स्वीकारताना जीएसटी भवनमधील राज्य सह आयुक्ताला रंगेहात पकडण्यात आले. विशाल बाबु हापटे (वय – 35 वर्षे, पद- (राज्य कर निरीक्षक वर्ग 2 रा.शिवाजी तालीम जवळ,जैन बस्ती,ता.हातकणंगले) असे त्याचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या मित्राचा टायर्स विक्रीचा व्यवसाय आहे. त्या व्यवसायचा जी.एस.टी. भरला नाही म्हणून त्याच्यावर कारवाई न करण्यासाठी राज्य सह आयुक्त हापटे याने तक्रारदारांकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी केली.यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 1 सप्टेंबर रोजी तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी सापळा लावून तक्रारदाराकडून लाच स्वीकारत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. हापटे याच्या विरुद्ध शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपअधीक्षक सरदान नाळे, पोलीस निरीक्षक बापू साळुंके, श्रेणी उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, सुधीर पाटील, संगीता गावडे, मयूर देसाई,रुपेश माने,संदीप पवार,सूरज अपराध यांनी या कारवाईत सहभाग घेतला.