भवानी मंडपापर्यंत दुचाकी, चारचाकी वाहनांना प्रवेश; पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची पाहणी
कोल्हापूर प्रतिनिधी
शारदीय नवरात्रोत्सव काळामध्ये यंदा दर्शनरांग भवानी मंडप येथून सुरु करण्यात येणार आहे. शेतकरी संघाच्यासमोरील बाजूस 2019 प्रमाणेच दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. याच ठिकाणाहून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल, असा निर्णय घेण्यात आला. यंदा दुचाकी व चारचाकींना भवानी मंडपापर्यंत प्रवेश दिला जाणार आहे. बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी येथे दुचाकी व तिनचाकी वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भवानी मंडप, गुजरी, महाद्वार रोडची गुरुवारी सकाळी पाहणी केली. त्यानंतर येथील व्यापाऱयांची बैठक घेतली. यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, करवीर तहसीलदार शितल मुळे-भामरे, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, स्नेहा गिरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश म्हात्रे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता नारायण भोसले, देवस्थान समितीचे पाटील उपस्थित होते.
2021 नवरात्रोत्सवकाळामध्ये शिवाजी चौकातून दर्शनरांग करण्यात आली होती. यावेळी भाविकांची गैरसोय झाली होती. व्यापाऱ्यांनीही याला विरोध केला होता. यंदा मात्र प्रशासनाने भवानी मंडप येथूनच दर्शनरांग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. भवानी मंडप ते सरलष्कर भवन येथे बॅरीकेटींग लावून मंडप उभारण्यात येणार आहे. भाविकांना या ठिकाणाहून म्हणजेच पश्चिम दरवाजातून प्रवेश दिला जाणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचे भाविक व व्यापाऱ्यांच्यातून स्वागत होत आहे.
पेड पास एंट्री दक्षिण दरवाजातून
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी पेड पास एंट्री देण्यात येणार आहे. दररोज 1 हजार पेड पास वितरीत करण्यात येणार आहेत. देवस्थान समिती कार्यालयातून हे पास देण्यात येणार आहेत. या पासधारकांना दक्षिण दरवाजातून एंट्री देण्यात येणार आहे. शनि मंदिर शेजारील दरवाजातून ही दर्शन रांग असणार आहे.
रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग
महाद्वार रोड ते पापाची तिकटी मार्गावर दुतर्फा दुचाकी वाहनांच्या पार्किंगचे नियोजन करण्यात येणार आहे. या रस्त्यावरील व्यापाऱयांना दारातील अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. व्यापाऱयांनी दारामध्ये ठेवलेल्या लोखंडी जाळ्या काढण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. गुरुवारी या मार्गावर महापालिकेच्यावतीने पांढरे पट्टे मारण्यात येणार आहेत. या पटय़ांच्या आतच दुचाकी पार्क करण्यात येतील.
आज फेरीवाल्यांची बैठक
नवरात्रोत्सवात फेरीवाल्यांना व्यवसायासाठी कोठे उभा राहायचे याबाबत गुरुवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये बैठक होणार आहे. पापाची तिकटी ते महाद्वार रोडवर पांढऱया पट्टय़ामध्ये फेरीवाल्यांना उभा राहण्याची मुभा द्यावी, अशी मागणी फेरीवाले संघटनेकडून करण्यात आली.
भाविकांकडून समाधान
गतवर्षी नवरात्रोत्सव काळामध्ये शिवाजी चौक ते भवानी मंडप सरलष्कर भवनमार्गे मंदिरापर्यंत बॅरीकेटींग करुन दर्शनरांग उभारण्यात आली होती. यामुळे भाविकांना खुप लांबून मंदिरात यावे लागत होते. मात्र यंदा दर्शनरांगच भवानी मंडप येथून केल्याने त्रास कमी होणार आहे. यामुळे भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे.