Kolhapur Historical News : राजर्षी शाहू खासबाग मैदानाच्या एका बाजूची बांधलेली भिंत तीन दिवसापूर्वी कोसळली.एका महिलेच्या वाट्याला दुर्दैवी मृत्यू आला.पण वास्तव हे आहे की, ज्या बाजूची भिंत कोसळली .ती भिंत म्हणजे मूळ भिंतीला महापालिकेने तीस वर्षांपूर्वी केलेली डागडुजी होती.आणि ही डागडुजी करताना केलेल्या खुदाईच्या वेळी 11 ते 15 व्या शतकातल्या मूर्ती ,भांडी ,पुजेचे, घरगुती वापराचे साहित्य ,रांजण अशा पन्नास हुन अधिक प्राचीन वस्तूंची जणू खाणच तिथे सापडली होती. त्यामुळे शाहू राजांनी उभे केलेले एक कुस्ती मैदान म्हणून तर या परिसराची ओळख आहेच.पण या परिसरात अकराव्या शतकापासूनचा म्हणजे हजार ते पंधराशेहून अधिक वर्षाचा कोल्हापूरचा इतिहास दडला गेला आहे.
भिंत पडण्याची , त्याखाली सापडून एका महिलेचा मृत्यू होण्याची घटना खूप वाईट आहे.या एका घटनेतून जुन्या इतिहासचे अनेक कंगोरेही डोकावू लागले आहेत .विशेष हे की , कुस्ती मैदानाच्या तीस वर्षांपूर्वी केलेल्या डागडुजीवेळी भरावात सापडलेल्या सर्व प्राचीन वस्तू आज टाऊन हॉलमध्ये कोल्हापूर पुरातन वस्तुसंग्रहालयात अतिशय व्यवस्थित जतन करून ठेवलेल्या आहेत . या सर्व वस्तूंचा काळ इसवीसन अकराशे ते पंधराशे वर्षांपूर्वीचा आहे.आणि या वस्तू मिळाल्याचे प्राप्त स्थळ केशवराव भोसले नाट्यागृहाचे आवार म्हणजेच कुस्ती मैदान परिसराचा उल्लेख आहे.
कोल्हापुरात संस्थान काळात खासबाग ,बेलबाग, तुतुची बाग , केवड्याची बाग अशा वेगवेगळ्या बागा होत्या. त्यावेळी खासबागेत राजश्री शाहू महाराजांनी 1912 च्या सुमारास रोम मधील ओपन एअर थिएटरच्या धर्तीवर कुस्ती मैदान बांधले. या बागेत तिन्ही बाजूंनी उतरता भराव त्याला पाठीमागे दगडी संरक्षण भिंत. समोर गोलाकार कुस्तीचा आखाडा अशी रचना केली. कुठेही बसले तरी कुस्ती व्यवस्थित दिसेल असे त्याचे खास वैशिष्ट्या राहिले. या कुस्ती मैदानाने कोल्हापूरच्या कुस्ती वैभवावर मुकुट चढवला. मैदानातील माती अंगाला लागणे म्हणजे देशभरातील पैलवानांच्या दृष्टीने अभिमानाचे क्षण ठरले.
1985 च्या सुमारास मैदानाच्या आत येताना डाव्या बाजूचा भाग म्हणजेच आता पडलेल्या भिंतीस फुगवटा आला होता.या फुगवट्यामुळे संपूर्ण भिंतीला धोका होऊ नये म्हणून या भिंती शेजार चा भराव काढून दगडी भिंतीला आतून सपोर्ट देण्यात आला. आणि या कामासाठी त्या बाजूचा मूळ भराव बाजूला काढताना त्यातून दगड खर माती बरोबरच जुन्या मुर्त्या बाहेर येऊ लागल्या. परिस्थितीनुसार तातडीने भराव बाजूला काढण्याचे काम थांबवण्यात आले. पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी पुण्याहून कोल्हापुरात आले. त्यांच्या देखरेखिखाली मातीतील वस्तू काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आल्या हे काम होईपर्यंत या आवारात इतर कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता कै.तानाजी सूर्यवंशी हे या कामावर मुकादम होते.
पुरातत्व विभागाला कुस्ती मैदानाच्या या भागात गरुड देवता ,यक्षिणी,गरुड स्तंभ ,समई,घंटा ,करंड ,हंडे ,धान्याचे मोठे रांजन ,तुळशी वृंदावन,पंचपात्र ,कमंडलू,मापटे,धूपपात्र,दांड्याचा तवा,पाटा ,खलबत्ता ,तिपाई जनावराच्या गळ्यातील घुंगुर ,समया असे पूजेचे व घरगुती वापराचे साहित्य मिळाले.त्यातील भांड्यांचा अतिशय सुबक आकार पहाता अकराशे ते पंधराशे या काळातील कोल्हापूरच्या समाज जीवनाचे प्रतीक त्यातून उमटले गेले आहे.
या मूर्तींचा काळ इसवीसन अकराशे ते पंधराशे हा असल्याचे पुरातत्व विभागाने स्पष्ट केले.सर्व वस्तू ताब्यात घेतल्या.व पुन्हा पुढे कुस्ती मैदानाच्या भिंतीचे काम पुढे सुरू करण्यात आले.जवळ जवळ 35 वर्षांनी म्हणजे मंगळवारी याच भिंतीचे बांधकाम ढासळले.व त्या ठिकाणी सापडल्याने अश्विनी आनंद यादव या महिलेला मृत्युने गाठले.संध्या तेली या गंभीर जखमी झाल्या.शाहूकालीन कुस्ती मैदानाची अवस्था,त्याच्याकडे झालेले दुर्लक्ष यावर संतप्त टीकेची झोड उठली.पण ही घटना शाहू खासबाग मैदान परिसराच्या इतिहासाला स्पर्श करून गेली.