केसपेपर काढताना डोक्यात स्लॅबचा काही भाग पडल्याने इसम जखमी
कोल्हापूर प्रतिनिधी
दाढ दाखवायला आल्यावर एका इसमाच्या डोक्यात स्लॅबचा काही भाग पडून डोकचं फुटल्याचा प्रकार आज शनिवारी दुपारी सीपीआरमध्ये घडला. यामध्ये जवाहरनगर येथील राजू तय्यब (वय46) हे जखमी झाले. यावेळी तिथे दूसऱ्या कामानिमित्त आलेले सामाजिक कार्यकर्ते सचिन कदम यांनी तय्यब यांना तत्काळ सीपीआरमधील आपघात विभागात दाखल केले. येथे त्यांच्या डोक्याला ड्रेसिंग करण्यात आले. दोन टाके पडल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.
याबाबतची माहिती अशी, राजू तय्यब्ब हे जवाहरनगर येथे वास्तव्यास आहेत. ते शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दाढेवरील उपचारासाठी सीपीआरमध्ये आले होते. यावेळी बाह्यरुग्ण विभाग येथे ते केस पेपर काढत असताना अचानक इमारतीचा स्लॅब काही भाग राजू यांच्या डोक्यावरच कोसळला.त्यात त्यांना गंभीर इजा झाली.
या विभागाची इमारत जीर्ण झाली आहे. इमारतीच्या खिडक्यांच्या बाहेरील भागाचा स्लॅबचा काही भाग कोसळू लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने केसपेपर काढण्याच्या ठिकाणी पत्र्याचे शेड मारण्यात आले आहे. जखमी झालेल्या राजू तय्यब यांना दूसऱ्या कामानिमित्त आलेले सामाजिक कार्यकर्ते सचिन कदम व येथील सुरक्षा रक्षकांनी तय्यब यांना तत्काळ अपघात विभागात उपचारासाठी दाखल केले. येथे त्यांच्या डोक्याला ड्रेसिंग करण्यात आले. यामध्ये तय्यब यांच्या डोक्याला दोन टाके पडले.
तय्यब यांच्या डोक्याला दुखापत होवून रक्ताबंबळ झाल्याने इतर रुग्ण आणि त्या इमारती खाली ये जा करणाऱ्या कर्मचाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देण्ययाची मागणी नागरिकांकडून होत आहे.