ग्रामपंचायतीचे ग्रामस्थांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष
पाचगाव वार्ताहर
पाचगाव परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून या कुत्र्यांकडून परिसरातील अनेक महिला, लहान मुलांना चावा घेण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र ग्रामपंचायतीकडून या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे ग्रामस्थांमधून ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
पाचगाव परिसरातील अनेक उपनगरांमध्ये कुत्र्यांचे कळप आढळून येत आहेत. सकाळी फिरायला जाणाऱ्या ग्रामस्थांनाही या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. मोटरसायकल स्वरांच्या मागेही ही कुत्रे लागतात यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
पाचगाव परिसरातील वटवृक्ष कॉलनी, पोवार कॉलनी, म्हाडा कॉलनी, राम मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात या कुत्र्यांचे कळप आढळतात. ग्रामस्थांना त्रासदायक असणारे व सर्व गावाला दिसणारे हे कुत्र्यांचे काळप सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना दिसत नाहीत काय? त्यावर उपाय योजना का करण्यात येत नाही? असा प्रश्न ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.
या कुत्र्यांकडून लहान मुले महिलांवर होणाऱ्या हल्ल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. पाचगाव ग्रामपंचायतीला याबाबत वारंवार कळवून ही ग्रामपंचायतीमार्फत यावर कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्यामुळे ग्रामस्थांमधून ग्रामपंचायत कारभाराबाबत तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.