अहिल्या परकाळे,कोल्हापूर
राज्यभरातील सर्व विद्यापीठांना उच्च शिक्षण संचालनालयाच्या वतीने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रांसाठी तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे मानधन उच्च शिक्षण संचालनालयाने निश्चित केले आहे. मार्च 2023 पर्यंत पदवीला 625 व पदव्युत्तरला 750 रूपये मानधन होते. आता एप्रिल 2023 पासून या मानधनात वाढ केली असून पदवीला 900 तर पदव्युत्तरला 1000 हजार रूपये केले आहे. परंतू शिवाजी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांचा तासिका व तास याचा तिडा न सुटल्याने कोल्हापूर, सांगली आणि सातारा तिन्ही जिल्ह्यातील महाविद्यालयांत सीएचबीवर काम करणाऱ्या प्राध्यापकांना मात्र 720 रुपये मानधनावर समाधान मानावे लागले आहे. तरी सीएचबीला 60 मिनिटाचा तास करून नवीन अध्यादेशानुसार मानधन द्यावे, अशी मागणी सीएचबीवर काम करणाऱ्या प्राध्यापकांकडून होत आहे.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत अनुदानित व विनाअनुदानित जवळपास 290 महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये सीएचबीवर काम करणारे 1 हजार 819 प्राध्यापक आहेत. या प्राध्यापकांना एप्रिल महिन्याचे मानधन नवीन शासन आदेशानुसार उच्च व तंत्र शिक्षण सहाय्यक कोल्हापूर विभागीय कार्यालयाकडून वितरीत केले आहे. परंतू काही महाविद्यालयांनी 720 रूपये मानधन सीएचबी प्राध्यापकांना दिल्याने सीएचबीधारकांमधून नाराजी व्यक्त होतेय. यावर शासन निर्णय घेणार की नाही ? असा प्रश्न उपस्थित होतोय.
शासन निर्णयानुसार पुर्वीचे प्रतितास मानधन व सुधारीत प्रतितास मानधन
अभ्यासक्रमाचा प्रकार 2021 नुसार प्रति तास सैध्दांतिक 2021 नुसार प्रति तास प्रात्यक्षिके सुधारीत प्रति तास सैध्दांतिक सुधारीत प्रति
तास प्रात्यक्षिके
कला, वाणिज्य, विज्ञान (पदवी) 625 250 900 350
कला, वाणिज्य, विज्ञान (पदव्युत्तर) 750 300 1000 450
शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षण (पदवी) 750 300 1000 450
विधी (पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम) 750 300 1000 450
एप्रिलचे मानधन 720 प्रमाणे
शासनाने मानधनात वाढ केली असून शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सीएचबीधारकांना नवीन आदेशानुसार 900 रूपये प्रति तास मानधन मिळत नसून ते 720 रूपये प्रमाणे मिळाले आहे. तरी शासन नियमानुसार मानधन मिळावे, अशी प्रतिक्रिया एका सीएचबीधारकाने नाव न सांगण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली आहे.
नवीन आदेशाची अंमलबजावणी
शासनाने काढलेल्या नवीन आदेशाची उच्च शिक्षण सहसंचालक कोल्हापूर विभागीय कार्यालयाने अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे पीजी आणि युजीच्या सीएचबी प्राध्यापकांना शासन आदेशानुसार एप्रिल महिन्याचे मानधन देण्यात आले आहे.
डॉ. हेमंत कटरे (उच्च शिक्षण सहसंचालक कोल्हापूर विभागीय कार्यालय)