प्रतिनिधी, कोल्हापूर
Kolhapur Sport News : डॉ. चंद्रशेखर साखरे यांची जळगावला बदली झाल्याने कोल्हापूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी पद सध्या रिक्त आहे. आगामी काळातील शालेय क्रीडा स्पर्धा आणि जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलांसह क्रीडा योजना राबविण्यासाठी नवीन जिल्हा क्रीडा अधिकारी तातडीने नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर व जिल्हा क्रीडा सेलच्या वतीने करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, प्रदेश प्रतिनिधी संजय कुराडे आणि क्रीडा सेलचे शहर जिल्हाध्यक्ष सुहास साळोखे यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
क्रीडा सेलचे अध्यक्ष सुहास साळोखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी क्रीडा उपसंचालक रवींद्र सबनीस यांना निवेदन सादर केले. सबनीस यांच्या वतीने क्रीडाधिकारी शंकर भास्करे यांनी निवेदन स्वीकारले.यावेळी संजय पडवळे,संजय कुरडे, सुनील काटकर,अभिषेक शिंदे,उत्कर्ष बचाटे,रियाज कागदी आदी उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर ही शाहूकालिन क्रीडा नगरी आहे.कोल्हापूरच्या खेळाडूंनी ऑलिम्पिक,आशियाई स्पर्धा,राष्ट्रकुल स्पर्धांसह राज्य,राष्ट्रीय स्पर्धात विविध खेळात लौकिक संपादन केला आहे. क्रीडाविषयक शिष्यवृत्ती मिळविणाऱ्यात राज्यात कोल्हापूरच्या खेळाडूंचा दुसरा क्रमांक लागतो.अशा स्थितीत शालेय क्रीडा स्पर्धा तोंडावर असताना आणि तालुका क्रीडा संकुलांची कामे अर्धवट असताना जिल्ह्याला जिल्हा क्रीडा अधिकारी नाही, ही स्थिती योग्य नाही. खेळाडूंचा विचार करून तातडीने नवीन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याची नियुक्त करण्यात यावी.या संदर्भात वेगाने कार्यवाही,असेही साळोखे यांनी निवेदनात म्हटले आहे.