अकरावी व तंत्रनिकेतनची प्रवेश प्रक्रिया रेंगाळली
प्रतिनिधी/कोल्हापूर
शासकीय तंत्रनिकेतन आणि अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे नावनोंदणी आणि शाखा निश्चिती सुरू आहे. तर आयटीआयचे वेळापत्रक जाहीर झाल्याने सोमवार 25 जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे आयटीआय प्रवेशाला वेग आला असला तरी तंत्रनिकेतन आणि अकरावीची प्रवेश प्रक्रिया गेल्या एक महिन्यापासून रेंगाळलेली आहे. प्रवेश अर्ज संकलन केंद्रावरही दरवर्षीप्रमाणे गर्दी पाहायला मिळत नाही. एकूणच तंत्रनिकेतन आणि अकरावीच्या प्रवेशाची गाडी कधी पुढे जाणार, असा सवाल विद्यार्थी व पालकांकडून विचारला जात आहे. तसेच शिक्षण विभागाबद्दल नाराजीही व्यक्त होत आहे.
अकारवीला घेतले 7764 विद्यार्थ्यांनी प्रवेश
अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शहरातील 31 कॉलेजमधील 10 हजार 960 जागांसाठी सुरु आहे. वाणिज्य व विज्ञान शाखांसाठी 7 हजार 764 विद्यार्थ्यांनी शाखा निश्चिती केली आहे. शहरातील कॉलेजमधील अकरावीची ऑनलाईन प्रवेशाचे पुढील वेळापत्रक सीबीएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यावर प्रसिद्ध होणार आहे. शाखानिहाय अकरावी प्रवेश ः विज्ञान ः 5414, वाणिज्य मराठी माध्यमः 1338, वाणिज्य इंग्रजी माध्यम ः 1012, एकूण ः 7764.
हे ही वाचा : आयटीआयची प्रवेश प्रक्रिया जाहीर
शासकीय तंत्रनिकेतन
कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. गेल्या पंधरा दिवसात 700 जागांसाठी 1360 नोंदणी अर्ज आले आहेत. प्रवेश अर्ज निश्चिती करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. यंदा प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त आले आहेत. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा मेरीट लिस्टचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. तरी विद्यार्थ्यांनी www.gpkolhapur.org.in, www.dtemaharashtra.gov.in या संकेत स्थळावर अर्ज भरावे.
आयटीआयची प्रवेश निश्चिती शनिवारपर्यंत
आयटीआय मध्ये 1362 जागांसाठी 2975 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून कन्फर्मेशन केले आहे. आता कोल्हापुरातील आयटीआयमध्ये 30 ट्रेडसाठी 1362 जागा भरल्या जाणार आहेत. आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाल्याने प्रवेशाला वेग आला आहे. शनिवार 23 जुलैपर्यंत अर्ज निश्चितीला वेग आला आहे. तर सोमवार 25 जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. यंदा क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. कळंबा रोडवरील शासकीय आयटीआयसह जिल्हयातील शासकीय, खासगी आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेश प्रक्रियेची माहिती http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे, अशी माहिती शासकीय आयटीआयचे प्राचार्य रवींद्र मुंडासे यांनी सांगितले.