सुरेश पाटील / पुलाची शिरोली
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत (सांगली फाटा) येथील मंगल कार्यालय समोर गाड्यांच्या पार्किंग मुळे सेवा मार्गावर वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. मंगल कार्यालय मालकांनी पार्किंगची व्यवस्था केली नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत असून संबंधित विभागाने येथील मंगल कार्यालय चालकांवर कारवाई करण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या पश्र्चिम बाजूला सांगली फाटा येथे तीन मंगल कार्यालये आहेत. सेवा मार्गालगत असलेल्या बुधले मंगल कार्यालय व पटेल मंगल कार्यालय यांनी समारंभासाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था अथवा त्यासाठी आवश्यक असणारे जागा राखीव ठेवलेले नाही. त्यामुळे या दोन्ही मंगल कार्यालयमध्ये कार्यक्रमासाठी येणाऱ्या गाड्या सेवा मार्गावरच पार्किंग केल्या जातात.
सांगली फाटा येथे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होते. अशावेळी पंचगंगा नदी शेजारील दर्ग्या समोरील रस्त्यावरून वाहने सोडण्याची पर्यायी व्यवस्था आहे . या सेवा मार्गावरून वाहतूक सुरू केली जाते पण या दोन मंगल कार्यालयासमोरील गाड्या अस्ताव्यस्त लावून सेवा मार्ग वाहतुकीसाठी बंदच ठेवला जातो. हा मार्ग बंद असल्यामुळे अत्यावश्यक सेवेसह अन्य वाहने खोळंबून राहतात. हा सेवा मार्ग जणू मंगल कार्यालयाच्या मालकांनी आपल्यासाठी राखीव ठेवला आहे समजून त्यांनी आपला व्यवसाय सुरू ठेवला आहे. याकडे शिरोली पोलीस तसेच राज्य व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी डोळे झाख करीत कारवाई करताना दिसत नाहीत. यामुळे वाहनधारकांतून नाराजी व असंतोष व्यक्त केला जात आहे.