दहा वर्षापासून गरीब मुस्लिम कुटुंबाला जीवनावश्यक साहित्यांचे वाटप, गरजूंप्रती माणुसकीची वीण केली घट्ट
कोल्हापूर संग्राम काटकर
रमजान ईद पाच-सहा दिवसांवर आली आहे, पण ती साजरी करण्यासाठी जवळ आवश्यकतेप्रमाणे पैसेच नाही. आता ईद कशी साजरी करायची अशा प्रश्नाच्या गर्तेत सापडलेल्या गरीब मुस्लिम कुटुंबीयांना ईदसाठी जीवनावश्यक साहित्यांची भेट देण्याचे कार्य बाराईमाम तालीमजवळील मोमीन कुटुंबीय करत आहे. गेल्या 10 वर्षात या कुटुंबाने तब्बल 2340 गरीब कुटुंबीयांना ईदची भेट देऊन त्यांच्या घरात आनंद फुलवला आहे. मंगळवारी 3 रोजी साजरी होणाऱ्या रमजान ईदसाठीही 150 गरीब मुस्लिम कुटुंबीयांना जीवनावश्यक साहित्याची भेट दिली आहे. गेली 10 दिवस संपूर्ण मोमीन कुटुंबीय भेट वाटपात व्यस्त होते. या भेट कार्यातून गरीबांप्रती असावी लागणारी माणुसकीची वीनही अधिक घट्ट झाली आहे.
मुस्लिम धर्मात रमजान ईदची नमाज अदा करण्यापूर्वी गरिबांना दान स्वरुपात काहीतरी देण्याची परंपरा आहे. या दानाला जकात असं संबोधलं जातं. प्रत्येक मुस्लिम व्यक्ती आपल्या उत्पन्नातील अडीच टक्के उत्पन्न जकात म्हणून बाजूला काढून त्याचा दानधर्मासाठी वापर करते. इतरांप्रमाणेच प्रत्येक रमजान ईदला दानधर्म करणाऱ्या मुनीर मोमीन व कुटुंबाने 2012 साली आपल्या उत्पन्नातून गरीब कुटुंबीयांना रमजान ईदची भेट देण्याचे पाऊल उचलले. मुनीर यांच्या या भेटकार्याला हातभार लावण्यासाठी बहीण शबाना डंगरे, मेहुणे अय्याज मोमीन, मित्र सलिम गडकरी यांनीही पैसे देण्यास समर्थता दाखवून 2012 सालच्याच रमजान ईदसाठी 20 हजार रुपये मुनीर यांच्याकडे दिले. जमलेल्या पैशात मोमीन कुटुंबीयाने 30 ते 40 हजार रुपये घालून रमजान ईदची भेट देण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य खरेदी केले. या साहित्यातून 5 किलो तांदुळ, 5 किलो गहु, 2 किलो साखर, 1 किलो डाळ, 1 किलो तेल, चटणी पॅकेट, पावकिलो चहापुड, आंघोळीचे दोन साबण, धुण्याचे साबण 3, भांडी धुण्याचा साबण 1 अशा साहित्यांची 150 पॅकेट तयार केली. यानंतर मुनीर यांनी गरजवंत 150 कुटुंबीयांना ईदची भेट म्हणून सर्व पॅकेटस्चे वाटप केले. भेट देण्याचा या कार्यामुळे घरी समाधानाची लहरच निर्माण झाली. त्यामुळे मोमीन कुटुंबीयांनी दरवर्षीच्या रमजान ईदसाठी गरीबांना ईदची भेट देण्याचे ठरवले. त्यानुसार ईदमध्ये गरीबाला चार घास देणारे हे भेट कार्य वृद्धिगत करण्यासाठी प्रत्येक ईदच्यावेळी शबाना डंगरे, अय्याज मोमीन, सलिम गडकरी यांनीही पैसे देण्यास सुरुवात केली.
गेली 9 वर्षे रमजान महिन्यात या तिघांकडून प्रत्येकी 10 हजार रुपये मोमीन कुटुंबाकडे दिले जात आहेत. या पैशात मोमिन कुटुंबीय 50 हजार रुपयांचा हिस्सा घालून सर्व जीवनावश्यक साहित्य खरेदी करते. या साहित्याचे पॅकेटस् बनवून ते गरजू मुस्लिम कुटुंबीयांना ईदची भेट म्हणून देते. कुटुंब अत्यंत गरीब असेल तर 300 रुपयांची रोकडही भेटीसोबत दिली जाते. ईद तोंडावर मिळणाऱया या भेटीमुळे मुस्लिम कुटुंबीय चिंतातूर होऊन अल्लाह आपको सलामत रख्खे असा आशिर्वादही मोमीन कुटुंबाला देत असतात. हा आशिर्वाद मोमीन कुटुंबीयांसाठी ऊर्जाच ठरला आहे. आपल्या भेटीमुळे गरीबाघरच्या माणसांचे पोट भरलं यातच समाधान असल्याचे मोमीन कुटुंबीय अभिमानाने सांगत आहे.
दिवाळीसाठी जीवनावश्यक साहित्याची भेट देतो…
मोमीन कुटुंबीयाने जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपण्याला प्राधान्य दिले आहे. जशी ईदसाठी जीवनावश्यक वस्तूंची भेट दिली जाते, तशीच भेट 150 गरिब हिंदू कुटुंबीयांनाही गेल्या 10 वर्षापासून देत आहोत. भेटीसोबत दिवाळीतील गरजू कुटुंबाला 200 ते 300 रुपयेही दिले जातात. आपल्या परीने समाजातील गरजूंना मदतीचा हात घेऊन त्यांच्या चेहऱयावर आनंद फुलणे यातच मोमीन कुटुंबीय समाधान मानत आले आहे.
मुनीर मोमीन (रा. बाराईमाम तालीम)