दरमहा 20 ते 30 हजार रुपयांची संघ व्यवस्थापनाकडे मागणी
दुसऱ्या फळीतील खेळाडूंना हंगामासाठी 40 ते 60 हजार रुपये मिळण्याची अपेक्षा
कोल्हापूर / संग्राम काटकर
कोरोनाकाळात समाधानकारक पैसे न मिळाल्याने व्यावसायिक स्टार खेळाडूंनी नव्या फुटबॉल हंगामात आपला भाव लाख ते दीड लाख रुपयांवर नेऊन ठेवला आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर लाखांची भाषा करणारे हे खेळाडू सामन्यात इलेव्हनमध्ये खेळणार आहेत. त्यांनी खेळण्यासाठी दरमहा 20 ते 30 हजार रुपयांची मागणी वरिष्ठ संघ व्यवस्थापनाकडे केली आहे. परदेशी खेळाडूंनीही दरमहा 80 ते 90 हजार तर राष्ट्रीय खेळाडूंनी 30 ते 40 हजार रुपयांची मागणी केली आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापनावर आर्थिक ताण तर आहेच शिवाय खेळाडूंना जादा पैसे देण्यासाठी स्पॉन्सरही शोधावा लागत आहे.
मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे छत्रपती शाहू स्टेडियममधील बहरात आलेला फुटबॉल हंगाम केएसएला स्थगित करावा लागला होता. त्यामुळे सर्व संघातील खेळाडूंना हंगाम स्थगित होईपर्यंत जेवढी रक्कम मिळाली होती, तेवढय़ावरच समाधान मानावे लागले. 2021ceO³es कोरोना संसर्ग कमी झाल्याने केएसएने फेब्रुवारीपासून फुटबॉल हंगाम सुरु केला. पाच स्पर्धाही झाल्या. पण यामध्ये मैदान गाजवण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंना थोडी-थोडी रक्कम घेऊनच खेळावे लागले होते. शिवाय कोरोनामुळे खेळाडूंमध्ये आलेली मरगळ, सरावाअभावी सामने खेळताना झालेली दमछाक आणि कट्टर प्रतिस्पर्धीकडून पराभव ही तीन कारणे डोळय़ासमोर ठेवून 2022 च्या नव्या फुटबॉल हंगामासाठी ताकदवर संघ बांधणी करण्याचा निश्चय पाच महिन्यांपूर्वीच संघ व्यवस्थापनाने केला होता.
संघ व्यवस्थापनाला झाले नाकीनऊ…
सामन्यात इलेव्हनमध्ये खेळणाऱया खेळाडूंना कोरोना व संघाची आर्थिक स्थिती सांगून 80 ते 90 हजार रुपये देऊन स्थान देण्याचे संघ व्यवस्थापनाने ठरवले होते. व्यवस्थापनाने परदेशी, राष्ट्रीयसह स्थानिक स्टार खेळाडूंचा आर्थिक ठोकताळा करुन संघ बांधणीसाठी 10 ते 15 लाख रुपयांची तजवीज केली होती. मात्र स्थानिक स्टार खेळाडूंनीच दरमहा 20 ते 30 हजार रुपयांची मागणी सुरु केल्याने संघ व्यवस्थापनाचे आर्थिक गणितच बिघडले. मुळात आपल्या संघातून खेळू इच्छिणाऱया परदेशी खेळाडूला दरमहा 80 ते 90 हजार व राष्ट्रीय खेळाडूला दरमहा 30 ते 40 हजार रुपये देण्यासाठी आर्थिक व्यवस्था करताना संघ व्यवस्थापनाच्या नाकीनऊ झाले होते.
दुसऱ्या फळीतील खेळाडूंचाही दर वधारला…
कोल्हापुरातील दुसऱया फळीतील स्थानिक खेळाडूंकडून केल्या जाणाऱया जादा रकमेच्या मागणीलाही संघ व्यवस्थापनाला सामोरे जावे लागत आहे. कारण दुसऱया फळीतील खेळाडू हंगामासाठी 40 ते 60 हजार रुपये मागत असल्याने संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक संघ व्यवस्थापनाने आणखी पैसे मिळवण्यासाठी नवीन स्पॉन्सर शोधायला सुरुवात केली आहे. सोबत संघाला सामन्यांसाठी द्याव्या लागणाऱया संपूर्ण कीटचा खर्च पेलण्यासाठीही प्रत्येक संघ व्यवस्थापन आता नवा स्पॉन्सर शोधत आहे. इतकेच नव्हे तर सामन्यादरम्यान खेळाडूंना दुखापत झाल्यास अथवा खेळाडूवर शस्त्रक्रीया करायची झाल्यास त्यासाठीही लाख-दोन रुपये उभा करण्याच्याही तयारीत प्रत्येक संघ व्यवस्थापन गुंतले आहे. आता लवकरच पुढील सात महिन्याची आर्थिक व्यवस्था पूर्ण करुन संघ व्यवस्थापन केएसएकडे संघ व खेळाडू नोंदणीचे पाऊल उचलणार आहे.
नवखे खेळाडू म्हणताहेत, पैसे नको…नोकरीला लावा…
येत्या 6 नोव्हेंबरपासून केएसएकडून वरिष्ठ संघ नोंदणी कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्यामुळे सर्वच संघांना संघ बांधणीचे काम येत्या 8 दिवसात पूर्ण करावे लागणार आहे. खेळाडुंकडून होणारी आर्थिक मागणी आणि संघाची तयारी यातूनच खेळाडूंचे संघातील स्थान पक्के केले जात आहे. अशातच काही नवखे पण चांगला गेम करणारे खेळाडू आम्हाला पैसे नकोत सरकारी नोकरी लावा, अशी मागणी करत आहेत
योगेश वणिरे, प्रशिक्षक- खंडोबा तालिम मंडळ