वाकरे प्रतिनिधी
कोल्हापूर-गगनबावडा महामार्ग बालिंगे येथे बंद असल्याने तातडीची गरज आहे त्यांनी अजूनही कोपार्डे, सांगरूळ फाटा, जनावरांचा बाजार, पडळ फाटा,यवलुज, निटवडे, वरणगे- पाडळी, चिखली, आंबेवाडी ते दसरा चौक कोल्हापूर या पर्यायी मार्गाने प्रवास करावा. अजूनही हा रस्ता सुरू असल्याची माहिती या प्रतिनिधींनी घेतली आहे.
या पर्यायी मार्गाबाबत बुधवारी सकाळी ९ वाजता या प्रतिनिधींनी माहिती घेतली असता अद्याप या रस्त्यावर महापुराचे पाणी आलेले नाही. काल रात्रभर पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याची पातळी कमी झाली आहे. आज सकाळी ८.१५ वाजता राधानगरी धरणाचा स्वयंचलित एक दरवाजा उघडल्याने आज सायंकाळपर्यंत पुराची पातळी वाढू शकते याची नोंद घेऊन पुढील प्रवास करावा. तसेच अत्यावश्यक असेल तर प्रवास करावा अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.
पर्यायी मार्ग अरुंद असल्याने वाहने जपून चालवणे गरजेचे आहे. प्रयाग चिखली येथील पूल अरुंद असल्याने या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. खुपिरे, शिंदेवाडी, वरणगे- पाडळी या मार्गावर महापुराचे पाणी असल्याने कोणीही या मार्गाने प्रवास करू नये. प्रशासनाने पुढील आदेश येईपर्यंत बालिंगे रस्ता वाहतुकीसाठी रस्ता पूर्णपणे बंद केला आहे.