बेळगाव : के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित के. आर. शेट्टी चषक महिलांच्या प्रदर्शनीय सामन्यात बेळगाव इलेव्हन संघाने नागराज क्रिकेट अकादमी संघाचा 9 गडय़ानी पराभव करून के. आर. शेट्टी चषक पटकाविला. मानसी मोरे हिला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर महिला क्रिकेटला प्राधान्य देण्यासाठी के. आर. शेट्टी फौंडेशनतर्फे दुसऱया वषीही महिलांसाठी प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात नागराज क्रिकेट अकादमी संघाने 16 षटकात 6 बाद 84 धावा केल्या. झोया काजीने 2 चौकारासह 35, साक्षी मुन्नोळीने 16, अश्मीरा के. ने 13 धावा केल्या.
बेळगाव इलेव्हनतर्फे चिन्मया बडिगेरने 14 धावात 2, समृद्धी जाधव, माही, श्वाती भाटी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव इलेव्हन संघाने 11.4 षटकात 1 बाद 86 धावा करून सामना 9 गडय़ानी जिंकला. मानसी मोरेने 5 चौकारासह 27, समृद्धी जाधवने 3 चौकारासह 18 धावा केल्या. विजेत्या संघाला मान्यवरांच्या हस्ते चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.
आज मंगळवारी मुख्य स्पर्धेतील क्वालिफायर व एलिमिनेटर सामने होणार आहेत. हुबळी टायगर्स व साईराज यांच्यात क्वालिफायर आणि केआर शेट्टी किंग्स व साई स्पोर्ट्स यांच्यात एलिमिनेटर लढत होईल.