मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : गोवा घटकराज्य दिन सोहळा उत्साहात माजी मुख्यमंत्री, उद्योग, संस्थांचा सत्कार
प्रतिनिधी /पणजी
पोर्तुगीजांच्या राजवटीविरोधात कुंकळ्ळी भागातील स्वातंत्र्यसैनिकांनी ज्या दिवशी लढा पुकारला, तो 15 जुलै हा दिवस ‘राष्ट्रीय युध्द स्मरण दिवस’ म्हणून साजरा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. याच दिवशी गोव्याचे प्रतिनिधी दिल्लीत जाऊन दिल्लीतील राष्ट्रीय युध्द स्मारकावर गोव्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहतील. त्यामुळे गोवा स्वातंत्र्यलढय़ातील हुतात्म्यांना राष्ट्रीय स्तरावर मान मिळणार असून ही गोमंतकीयांसाठी अभिमानाची बाब आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गोवा घटकराज्याच्या 35 व्या वर्धापन दिनानिममित्त दोनापावला येथील राजभवनच्या दरबार सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वरील घोषणा केली.
गोव्याच्या विकासाची चक्रे गतिमान
कुंकळ्ळी येथील हुतात्म्यांना अभिवादन करून मुख्यमंत्री म्हाणाले की कुंकळ्ळी येथील स्वातंत्रलढय़ातील बलिदानाचा दिवस हाच यापुळे ‘नॅशनल वॉर मेमोरियल डे’ म्हणजे ‘राष्ट्रीय युद्ध स्मरण दिवस’ असणार आहे. घटकराज्य दर्जा मिळाल्यानंतर राज्याचा विकास झाला. गेल्या काही वर्षापासून गोव्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार आहे. या डबल इंजिनच्या सरकारामुळे गोव्याच्या विकासाची चक्रे अधिक गतिमान झाली आहेत.
यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, केंद्रीय राज्य पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर, मंत्री माविन गुदिन्हो, नीळकंठ हळर्णकर, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, सुदिन ढवळीकर, सुभाष फळदेसाई, रोहन खवटे व अन्य मंत्री, आमदार तसेच विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
गोवा स्वतंत्र झाल्यानंतर गोव्याच्या विकासासाठी योगदान देणारे माजी मुख्यमंत्री तसेच संस्था व कंपन्या मिळून 35 जणांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा उपक्रम दरवर्षी घटकराज्य दिनाच्या कार्यक्रमात होणार असून पुढच्या वर्षी 36 संस्था तसेच कंपनींचा गौरव करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यभाषा जाहीर झाल्यानंतर मिळाले घटकराज्य
कोकणी ही गोव्याची स्थानिक भाषा असून ती विकसीत करण्यासाठी कोकणी भाषेचा प्रशासनाच्या कामकाजात उपयोग होणे गरजेचे आहे. कोकणी भाषा ही राजभाषा म्हणून जाहीर केल्यानंतरच राज्याला घटकराज्याचा दर्जा मिळाला आणि गोवा हे स्वतंत्र राज्य झाले. त्यामुळे कोकणी भाषा विकसीत करण्यासाठी गोवा सरकार विविध उपक्रम राबवणार असल्याचेही मुख्यमंत्रीनी यावेळी सांगितले.
गोव्याचे खरे सौंदर्य ग्रामीण भागातच : राज्यपाल
राज्यपाल पिल्लई म्हणाले की गोव्याचे खरे सौंदर्य ग्रामीण भागातच आहे. गोव्यात देश विदेशांतील पर्यटक मोठय़ा प्रमाणात येत असतात. गोव्यात येणारे पर्यटक केवळ शहरापुरते मर्यादित न रहाता ग्रामीण भागात जाणे फार महत्वाचे आहे. गोव्याच्या ग्रामीण भागात अनेक नवीन गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, त्याचा लाभ पर्यटकांनाही घेता येईल. गोव्यात झपाटय़ाने होत असलेल्या विकासाचे कौतुकही राज्यपालांनी केले.
आतापर्यंतच्या माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार
गोव्याच्या विकासकामात योगदान देणाऱया माजी मुख्यमंत्र्यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतीचिन्ह व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हयात नसलेल्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातेवाईकांनी सत्कार स्विकारला. ज्या माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला त्यात माजी मुख्यमंत्री कै. भाऊसाहेब बांदोडकर, कै. शशिकलाताई काकोडकर, प्रतापसिंग राणे, चर्चिल आलेमाव, कै. लुईस प्रोतो बार्बोझा, रवी नाईक, कै. विफ्रेड डिसोझा, लुईझिन फालेरो, फ्रान्सिस सार्दिन, कै. मनोहर पर्रीकर, दिगंबर कामत व लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा समावेश होता. माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव व फ्रान्सिस सार्दिन पोहोचू शकले नाही. आलेमाव याचा सत्कार वालंका आलेमाव यांनी स्वीकारला. सार्दिन यांचा सत्कार नंतर पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
उद्योग, सामाजिक संस्थांचाही सन्मान
उद्योग संस्थामध्ये फॉमेंतो, धेंपो, साळगावकर, चौगुले, एनआरबी, डी. बी. बांदोडकर, वेदांता, एमआरफ, रोटरी क्लब, सिप्ला, लॉयला हायस्कूल मडगाव, सेंट जोसेफ हायस्कूल, ज्ञानप्रसारक हायस्कूल म्हापसा, इन्स्टिटय़ुट ऑफ मिनेझिस ब्रागांझा, कोकणी भाषा मंडळ, गोवा राज्य सहकारी बँक, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स, आयसीएआर, दै. गोमंतक, फोर्ट आग्वाद बिच रिसॉर्ट, मणिपाल हॉस्पिटल, झुवारी इन्डस्ट्री, गोवा वैद्यकीय महाविद्यालय, यांचा समावेश होता.
स्वयंपूर्ण मित्र पराग, मिलींद वेळीप, अभिर हेदे, गिता नागवेकर, लेन्सी फर्नांडिस, शंकर गावकर यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून करण्यात आली. नंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केल्यानंतर मंत्री माविन गुदिन्हो यांनी स्वागतपर भाषण केले. यावेळी स्वयंपूर्ण गोवा पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. रमेश वर्मा (आएएस अधिकारी) यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
श्रीपादभाऊंचे मराठीतून भाषण
केंद्रीय राज्य पर्यटनमंत्री श्रीपादभाऊ नाईक यांचेही भाषण झाले. ते म्हणाले की राज्याच्या भल्यासाठी कुणीही कुठेही तडजोड करू नये. प्रत्येकाने आपापल्या स्तरावर राजकारण करावे मात्र राज्याचे हित जपावे. आज गोवा स्वावलंबी होण्याच्या मार्गावर आहे. येणाऱया काळात गोवा हे देशात एक आदर्श राज्य बनाणार असल्याचेही ते म्हणाले. आपले संपूर्ण भाषण त्यांनी मराठीतून केले.
राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून घटकराज्य दिनाच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद व इतर मान्यवरांनी घटकराज्य दिनानिमित्त गोमंतकीय जनतेचे अभिनंदन केले असून शुभेच्छा दिल्या आहेत. गोव्यावर निसर्गाने सौंदर्याची उधळण केली असून त्यासाठी जगातून लोक येतात, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. सर्वांनी गोवा राज्याला आणि गोमंतकीय जनतेला शुभसंदेश दिले आहेत. गोव्याने विकासाची घौडदौड कायम ठेवून नवीन उंची गाठावी, प्रगती करावी असे पंतप्रधानांनी संदेशातून नमूद केले आहे.
गोमंतकीय जनतेला शुभेच्छा देताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणतात, गोवा हे देशातील सुंदर ठिकाण असून गोव्याला मोठी कला-संस्कृती लाभली आहे. गोव्याची प्रगती नेत्रदीपक असून ती अशीच चालू ठेवावी, असे त्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यातील जनतेसाठी चांगल्या आरोग्याची कामना केली आहे. जनतेची प्रगती होवो, असेही त्यांनी संदेशातून कळविले आहे. गोवा हे राज्य समुद्र किनारे, संस्कृती व आदरार्थी जनतेसाठी प्रसिद्ध असून देशाच्या विकासासाठी गोव्याचे योगदान मोठे आहे असे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोमंतकीय जनतेला राज्य दिनाच्या शुभेच्छा देताना गोवा हे सुंदर राज्य असल्याचे नमूद केले आहे. गोव्यासह जनतेचा विकास व्हावा अशी प्रार्थना केजरीवाल यांनी केली आहे. गोव्याच्या चौफेर विकासासाठी ज्यांनी योगदान केले त्यांचे स्मरण करा, गोव्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी शपथ घ्यावी, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.