प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर यंदा दिवाळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. सोमवारी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. शुक्रवारी शहरात वसुबारसनिमित्त गो-मातेचे पूजन झाले. त्यानंतर शनिवारी धनत्रयोदशी साजरी करण्यात आली.
लक्ष्मी पूजनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी बाजारात गर्दी झाली होती. पूजा साहित्य, फळे आणि फुलांना मागणी वाढली होती. शहरात सोमवारी दुकानांतून आणि घरांतून लक्ष्मी पूजन मोठय़ा उत्साहात होणार आहे.
त्यामुळे रविवारीच शहरात व्यापारीवर्गाकडून स्वच्छता आणि रंगरंगोटीचे काम सुरू होते. त्यामुळे शहरात दिवाळीची धामधूम दिसून येत आहे. सोमवारी लक्ष्मी पूजन तर बुधवारी भाऊबीज आणि पाडवा आहे. त्यामुळे बाजारात आबालवृद्धांसह महिलांची वर्दळ वाढली होती.
शहरात चार चाकी वाहनांवर निर्बंध
रविवारी दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली होती. त्यामुळे धर्मवीर संभाजी चौक, यंदेखुट सिग्नलजवळ बॅरिकेड्स लावून चार चाकी वाहनांवर निर्बंध घालण्यात आले होते. दिवाळीच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर ही वाहतूक थांबविण्यात आली होती. शहरात येणाऱया प्रवेशद्वारावरच बॅरिकेड्स लावून तीन चाकी व चार चाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होती.