अँजेलो मॅथ्यूजचे शानदार शतक, टिकनेर, हेन्री प्रभावी
वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीतील रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी लंकेने यजमान न्यूझीलंडला निर्णायक विजयासाठी 285 धावांचे आव्हान दिल्यानंतर न्यूझीलंडने दिवसअखेर दुसऱ्या डावात 1 बाद 28 धावा जमवल्या. सोमवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी 257 धावांची जरुरी असून त्यांचे 9 गडी खेळावयाचे आहेत. लंकेच्या दुसऱ्या डावात अँजेलो मॅथ्यूजने शानदार शतक झळकवले. लंकेने दुसऱ्या डावात 302 धावा जमवल्या. न्यूझीलंडचे टिकनेर, हेन्री आणि साऊदी हे प्रभावी गोलंदाज ठरले.
आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत ही कसोटी मालिका होत आहे. या पहिल्या कसोटीत लंकेने पहिल्या डावात 355 धावा जमवल्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात 373 धावा जमवत 18 धावांची आघाडी मिळवली. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात मिचेलने शानदार शतक तर हेन्री तसेच लेथम यांनी अर्धशतके झळकवली. लंकेने 3 बाद 83 या धावसंख्येवरून रविवारी चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. अँजेलो मॅथ्यूजने शानदार शतक झळकवताना 235 चेंडूत 11 चौकारासह 115 धावा झळकवल्या. चंडिमलने 2 चौकारासह 42 तर धनंजय डिसिल्वाने 7 चौकारासह 47 धावा जमवल्या. चंडिमल आणि मॅथ्यूज यांनी पाचव्या गड्यासाठी 105 धावांची भागीदारी केली. चंडीमल बाद झाल्यानंतर मॅथ्यूजने धनंजय डिसिल्वा समवेत सहाव्या गड्यासाठी 60 धावांची भर घातली. लंकेचा दुसरा डाव 105.3 षटकात 302 धावावर आटोपला. न्यूझीलंडच्या टिकनेरने 100 धावात 4, हेन्री 71 धावात 3 तर साऊदीने 57 धावात 2 गडी बाद केले.
लंकेकडून न्यूझीलंडला निर्णायक विजयासाठी 285 धावांचे आव्हान मिळाल्यानंतर न्यूझीलंडने खेळाच्या शेवटच्या सत्रात सावध फलंदाजी करत दुसऱ्या डावात 17 षटकात 1 बाद 28 धावा जमवल्या. लंकेचया रजिताने स्वत:च्या गोलंदाजीवर कॉन्वेला 5 धावावर टिपले. लॅथम 11 तर विलियम्सन 7 धावावर खेळत आहेत. सोमवारी ही कसोटी निकाली होईल अशी अपेक्षा आहे.
संक्षिप्त धावफलक : लंका प. डाव 355, न्यूझीलंड प. डाव सर्वबाद 373, लंका दु. डाव 105.3 षटकात सर्वबाद 302 (अँजेलो मॅथ्यूज 115, धनंजय डिसिल्वा 47, चंडिमल 42, ओशादा फर्नांडो 28 करुणारत्ने 17, कुशल मेंडिस 14, रजिता 14, टिकनेर 4-100, हेन्री 3-71, साऊदी 2-57). न्यूझीलंड दु. डाव 17 षटकात 1 बाद 28 (कॉन्वे 5, लॅथम खेळत आहे 11, विलियम्सन खेळत 7, रजिता 1-5).