‘आयएमए’ गोवाचा आठ राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान
प्रतिनिधी/ पणजी
गोवा हे देशाच्या नकाशात जरी छोटेसे राज्य असले तरी या राज्याचा अनेक बाबतीत दबदबा आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) गोवा शाखेला आठ राष्ट्रीय पुरस्कारांचा मान लाभल्याने आयएमए गोवा शाखेच्या भरीव योगदान व उत्कृष्ट कार्यामुळे राज्याचा राष्ट्रीय पातळीवर लौकीक झाला आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) गोवा शाखेने 2022 या सालात अनेक सेवाभावी उपक्रम राबविण्याबरोबरच अनेक उपक्रमांत उल्लेखनीय योगदान दिल्याने विविध प्रकारचे आठ राष्ट्रीय पुरस्कार लाभले आहेत, अशी माहिती आयएमए गोवा शाखेचे अध्यक्ष डॉ. रुफिनो मोंतेरो यांनी काल दिली.
26 ते 28 डिसेंबर रोजी प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे आयोजित आयएमए नॅशनल कॉन्फरन्स NATCON 2022 मध्ये आएमए गोवा राज्याचे सचिव डॉ. अमोल तिळवे यांनी गोवा राज्याचे प्रतिनिधित्व केले होते. शिवाय ते NATCON 2022 मध्ये झालेल्या केंद्रीय परिषदेच्या बैठकीतही ते उपस्थित होते. आयएमए गोवाच्या बॅनरखाली घेण्यात आलेल्या सर्व उपक्रमांसाठी विविध आठ राष्ट्रीय पुरस्कार लाभल्याचेही डॉ. मोंतेरो म्हणाले.
या पुरस्कारांमध्ये आयएमए गोवा राज्याचे सचिव डॉ. अमोल तिळवे यांना राष्ट्रपती प्रशंसा हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सहाजानंद प्रसाद सिंग यांच्या हस्ते डॉ. तिळवे यांना गौरविण्यात आले.
आयएएम गोवा बार्देश शाखेच्या डॉ. लॉयड डिसोझा यांना व तिसवाडी शाखेचे डॉ. आनंद दळवी यांनाही राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते प्रशंसा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट तरुण डॉक्टरचा राष्ट्रपती पुरस्कार डॉ. विश्वराज म्हाळसेकर यांना देण्यात आला.
जास्तीत जास्त नवीन सदस्य नोंदणीत आघाडीवर असलेल्या आयएएमच्या बार्देश शाखेला आएएम सदस्यत्व विकास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर तिसवाडी शाखेला सर्वोत्कृष्ट डॉक्टर डे सेलिब्रेशनसाठी राष्ट्रीय कौतुक पुरस्काराने गौरविण्यात आले.
महिला डॉक्टरांनीही उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे आयएएम गोवा राज्याच्या महिला डॉक्टर्स शाखेच्या डॉ. पूर्णिमा उसगावकर व डॉ. श्रद्धा मुळगावकर पाटील यांनाही राष्ट्रीय कौतुक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) गोवा शाखेला एका वर्षात प्रथमच जास्तीत जास्त आठ पुरस्कार लाभल्याने गोवा शाखेचे राष्ट्रीय पातळीवर कौतुक होत आहे. आयएएम गोवाचे अध्यक्ष डॉ. मोंतेरो यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांमध्ये आयएएम गोवाने सहभाग घेतला होता. 2022 मध्ये आयएएम गोव्याने केलेल्या सर्व प्रयत्नांसाठी राष्ट्रीय स्तरावर कौतुक केले जाणे हा एक मोठा सन्मान आणि विशेषाधिकार असल्याचे डॉ. मोंतेरो म्हणाले.
आयएएम गोवाने जानेवारी 2022 मध्ये ‘सर्वांच्या हृदयाने वृद्धांची काळजी घेणे’ हा कार्यक्रम घेऊन वृद्धाश्रमांना भेटी दिल्या होत्या.
राज्यात कोविडचे संकट वाढल्यानंतर सेवाभावी जाणिवेतून आयएएम गोवाने कोविड रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी दोन कोविड केअर सेंटर सक्रिय केले होते.
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्यातर्फे मिळालेल्या अनुदानातून निधीचा योग्य वापर करून वृद्धाश्रमांना भेटी देत वृद्धांसाठी आवश्यक उपकरणांसह मदत केलेली आहे.
राज्यस्थान येथे डॉक्टराच्या आत्महत्येची घटना घडल्यानंतर आयएएम गोवाने जुन्या जीएमसीच्या कॉम्प्लेक्समध्ये निषेध सभा घेऊन डॉक्टरांच्या सुरक्षेसंबंधी मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना योग्य सुरक्षा मिळवून द्यावी, या मागणीचे निवेदन दिले होते. तसेच राज्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनाही डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्यांबाबत माहिती देण्यात आली आली होती.
राज्याचे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांनी बोलावलेल्या स्टेक होल्डर्सच्या बैठकीत आयएएम गोवा शाखेने सर्व प्रलंबित समस्या, क्लिनिकल एस्टॅब्लशिमेंट ऍक्ट, डॉक्टरांच्या सुरक्षेबाबतचे मुद्दे उपस्थित करण्यात आलेले होते.
….चौकट करा…..
आयएएम गोवाने वर्षभरात राबविलेले उपक्रम…
1) सीएमई कार्यक्रम – 122
2) राज्यस्तरीय सीएमई कार्यक्रम – 22
3) सामुदायिक उपक्रम – 226
4) सार्वजनिक जागरूकता ऑनलाइन वेबिनार आणि सोशल मीडिया – 32
5) रक्तदान शिबिरे – 21
6) एकूण रक्तसंकलित – 548
7) थीम वर्क कार्यक्रम (वृद्धाश्रमाच्या भेटी) – 34
8) एकूण लाभार्थी संख्या – 1,24,537