दहा दिवस चालणार अभियान : प्रदेशाध्यक्ष तानावडे यांची माहिती
पणजी : येणारी लोकसभा निवडणूक डोळ्dयांसमोर ठेवून राज्यात पक्ष आणखी मजबूत करण्याच्या हेतूने बूथ सशक्तीकरण अभियान राबविण्यात येणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांगितले. 24 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. बूथ सशक्तीकरणा अभियान राबविण्यासाठी विस्तारक योजने बाबत काल मंगळवारी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. त्यासाठी केंद्रीय नेते शिव प्रकाश हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. देशभरात हा उपक्रम राबविण्यात येणार असून गोव्यातही राबविला जाईल, असेही तानावडे यांनी सांगितले.
दयानंद सोपटे अभियानाचे समन्वयक
यावेळी त्यांच्यासोबत अभियानाचे समन्वयक दयानंद सोपटे, दामू नाईक, सिध्दर्थ कुंकळीकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. आतापर्यंत केंद्राने दिलेले कार्यक्रम गोव्यात राबविण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. त्यामुळे हा कार्यक्रमही यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आतापर्यंत राज्य स्तरीय, जिल्हा स्तरीय तसेच मतदारसंघ स्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या आहेत, असेही तानावडे यांनी सांगितले.
नव्या कार्यकर्त्यांना सामावून घेणार
राज्यातील एकूण 40 मतदारसंघांत 489 सशक्तीकरण केंद्रे उभारण्यात येतील. ज्या बूथवर समिती नसेल तिथे समितीची निवड केली जाईल. भाजपात नव्या लोकांना समावून घेतले जाईल. आतापर्यंत भाजपात अनेक नेत्यांनी प्रवेश केलेला आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांनाही बूथ समितीवर घेतले जाईल. तसेच प्रत्येक मतदारसंघात एक प्रभारी निवडला जाईल. या कामाच्या दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभा आणि राज्यसभेत केलेल्या भाषणाची माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोचविली जाईल, असेही तानावडे यांनी सांगितले.