सर्व प्रकारच्या सायकल एकाच छताखाली उपलब्ध
प्रतिनिधी/ बेळगाव
हनुमाननगरजवळ बॉक्साईट रोडवरील गणश्री स्क्वेअर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या गियर हेड स्टुडिओ या सर्व प्रकारच्या सायकल विक्री शोरूमचे उद्घाटन कारंजीमठाचे प. पू. गुरुसिद्ध महास्वामीजी यांच्या हस्ते फीत कापून नुकतेच करण्यात आले. यावेळी झालेल्या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून चार्टर्ड अकाऊंटंट आर. एन. हारगुडे, कॅप्टन खटावकर, ओमर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी होते.
यावेळी व्यासपीठावर शोरुमचे संचालक प्राचार्य आर. जी. देसाई व मीना देसाई उपस्थित होत्या. प्रारंभी प्राचार्य आर. जी. देसाई यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे पुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी बोलताना गुरुसिद्ध स्वामीजी यांनी, आजच्या काळात शरीर संपत्ती हीच खरी संपत्ती असून ती जपण्यासाठी आपण आपल्या शरीराकडे लक्ष देणेही गरजेचे आहे. त्यामुळे सायकल चालवणे हा उत्तम व्यायाम होऊ शकतो, असे सांगून शुभेच्छा दिल्या. परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांनीही सायकल चालविल्यामुळे शरीर सुदृढ राहू शकते व रोगांपासून आपला बचाव होऊ शकतो, असे प्रतिपादन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रणजित चौगुले यांनी केले. अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून देसाई यांना शुभेच्छा दिल्या.