तिन्ही दलातील सैनिकांसाठी ‘लाभ’दायी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी ‘माँ भारती के सपूत’ या वेबसाईटचे अनावरण केले. या संकेतस्थळाच्या माध्यमातून देशातील कोणताही सामान्य नागरिक हुतात्मा सैनिक किंवा युद्ध किंवा इतर लष्करी कारवायांमध्ये जखमी झालेल्या सैनिकांना मदत करू शकेल. शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे झालेल्या एका कार्यक्रमात या वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले. 11 ऑक्टोबर रोजी आपला 80 वा वाढदिवस साजरा करणारे अमिताभ बच्चन यांना या वेबसाईटचे ब्रँड ऍम्बेसेडर बनवण्यात आले आहे.
राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे आयोजित कार्यक्रमात नव्या वेबसाईटचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ लेफ्टनंट जनरल अनिल चौहान, तिन्ही दलांचे प्रमुख, परमवीर चक्र पदक विजेते, क्रीडा जगतातील लष्करी अधिकारीही या सोहळय़ात सहभागी झाले होते. या वेबसाईटच्या माध्यमातून होणारे निधी संकलन तिन्ही सेवांसाठी असेल असे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. वास्तविक, अशा सैनिकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सरकारने अनेक कल्याणकारी कार्यक्रम राबवले आहेत, परंतु असा कल्याणकारी निधी असावा, अशी मागणी सर्वसामान्य जनता, सर्व देशभक्त आणि औद्योगिक संघटनांकडून सुरू झाल्यानंतर ही विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी, चित्रपट अभिनेता अक्षय कुमारने कोरोनाच्या काळात पीएम केअर्स रिलीफ फंडला 25 कोटी रुपये दिले होते. तेव्हाही लष्कर, हवाई दल आणि नौदलातील सैनिकांच्या मदतीसाठी असाच कल्याणकारी निधी असावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली होती. मात्र, आता त्या दिशेने पावले टाकण्यात आली आहेत.