वृत्तसंस्था/ भोपाळ
येथे सुरू असलेल्या महिलांच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील कास्यपदक विजेती लवलिना बोर्गोहेनने आपल्या वजन गटातून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.
75 किलो लाईटवेट गटातील झालेल्या लढतीत आसामच्या लोहलिनाने ओडिशाच्या पूजा नाईकचा पराभव करत शेवटच्या 8 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले आहे. या लढतीतील पहिल्या फेरीमध्येच पंचांनी लवलिनाला विजयी म्हणून घोषित केले. या स्पर्धेमध्ये 2016 च्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेतील रौप्यपदक विजेती रेल्वे खात्याचे प्रतिनिधीत्व करणारी सोनिया लाथेरने 57 किलो वजनगटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. कर्नाटकाच्या दिव्यानीने सोनियाला पुढे चाल दिली आहे. तामिळनाडूच्या एस. कलैवानीने 48 किलो वजनगटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवताना राजस्थानच्या स्वाती आर्याचा 5-0 असा पराभव केला. त्याचप्रमाणे राजस्थानची अर्षी खानम आणि झलक तोमर यांनीही आपल्या वजनगटातून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. खानमने उत्तर प्रदेशच्या प्रजापतीचा तर तोमरने 50 किलो वजनगटात आसामच्या काम्पी बोरोचा पराभव केला. 50 किलो वजनगटात हरियाणाच्या कल्पनाने महाराष्ट्राच्या जान्हवी वाघमारेचा 5-0 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. उत्तर प्रदेशच्या रजनी सिंग, रिंकी किशोर यांनीही आपल्या वजन गटातून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवताना अनुक्रमे पंजाबच्या भगतचा तसेच आंध्रप्रदेशच्या कविताचा पराभव केला.